नागपूर : अपघातात जखमी झालेली राष्ट्रीय पातळीवरील धावपटू मयूरी पटले हिच्या उपचारासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आर्थिक मदत घोषित केली आहे. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या मयूरीला एक लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या मयूरीचा अपघात झाला होता. त्यानंतर तातडीने तिच्यावर धंतोलीतील खाजगी इस्पितळात उपचारांना सुरुवात झाली. खर्च जास्त असल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांनी विद्यार्थी विमा योजनेअंतर्गत एक लाखांचा निधी मिळवून दिला. याशिवाय शिक्षक व कर्मचाऱ्यांनीदेखील आर्थिक योगदान दिले. परंतु उपचारांचा खर्च जास्त असल्याने प्राचार्यांनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीदेखील तातडीने या प्रकरणात लक्ष घालून आर्थिक मदत जाहीर केली.