क्षुल्लक कारणावरून नागपुरात दोघांवर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 21:30 IST2018-11-30T21:28:22+5:302018-11-30T21:30:07+5:30
क्षुल्लक कारणावरून दोघांवर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री घडली.

क्षुल्लक कारणावरून नागपुरात दोघांवर चाकूहल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्षुल्लक कारणावरून दोघांवर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री घडली. मोहम्मद रफिक मोहम्मद खुर्शिद (वय २९, रा. कुंदनलाल गुप्तानगर, नागपूर) आणि मेहबूब अली अशी जखमींची नावे आहेत.
रफिक आणि मेहबूब हे दोघे मित्र आहेत. गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास ते विटाभट्टी चौकाजवळच्या मैदानात गप्पा करीत बसले होते. बाजूलाच आरोपी अन्नू ठाकूर (रा. विनोबा भावे नगर) आणि त्याचा साथीदार सागर उभे होते. रफिकने बाजूला जाऊन लघुशंका केली. त्यावरून अन्नू ठाकूरने त्याला शिवीगाळ केली. परिणामी या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर अन्नू आणि सागरने रफिकला मारहाण करून त्याच्यावर चाकूहल्ला चढवला. पाठीवर आणि हातावर चाकूचे वार बसल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी मेहबूब धावला. आरोपींनी मेहबूबवरही चाकूहल्ला चढवला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. जखमींना मेयोत दाखल केल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. यशोधरानगरचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी रफिक आणि मेहबूबचे बयान नोंदवून घेतले. त्यानंतर अन्नू ठाकूर आणि सागरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी कुख्यात गुन्हेगार
आरोपी अन्नू ठाकूर हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याला विविध अमली पदार्थांचेही व्यसन आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. घटनेपूर्वी तो मैदानात साथीदार सागरसह नशा करीत बसला होता. चाकूहल्ला केल्यानंतर दोघेही फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.