लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : धाबा मालकास तिघांनी जेवणाचे पार्सल मागितले. त्याने धाबा बंद झाल्याचे सांगून पार्सल देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या तिघांनी प्राणघातक हल्ला चढविला. त्यात दाेघे गंभीर जखमी झाले. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-नागपूर मार्गावर गुरुवारी (दि. ३१) रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली.
प्रवीण सेवक व प्रफुल्ल अशी जखमींची तर उमेश हिरामन खडसे (३०), नीतेश हिरामन खडसे (२७) व घनश्याम मनाेहर डहाके (३७) तिघेही रा. सावनेर अशी आराेपींची नावे आहेत. तिघेही सावनेर-नागपूर मार्गालगत असलेल्या धाब्यावर गुरुवारी रात्री जेवणाचे पार्सल मागण्यासाठी गेले. धाबा बंद झाल्याने धाबा मालकाने त्यांना पार्सल देण्यास नकार दिला. त्यावर चिडलेल्या तिघांनी धाबा मालकासाेबत भांडण करीत लाकडी दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. प्रवीण व प्रफुल्ल मधे आल्याने तिघांपैकी दाेघांनी प्रवीणच्या पाेट व पाठीवर तसेच प्रफुल्लच्या मांडीवर चाकूने वार केले. त्यात दाेघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर तिघांनी तिथून पळ काढला. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी वैभव सुरेश घाेडसे (२१, रा. सावनेर) याच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध भादंवि३०७, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवित त्यांना अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक सतीश पाटील करीत आहेत.