एशियन फायर वर्क्स स्फोट प्रकरण: ३० मिनिटे, ३ धमाके अन् प्रचंड दहशत अन् कामगारांची पळापळ

By नरेश डोंगरे | Updated: February 17, 2025 00:27 IST2025-02-17T00:26:39+5:302025-02-17T00:27:02+5:30

कंपनीचे व्यवस्थापन हतबल, कामगार जिवाच्या आकांताने पळत होते!

Asian Fire Works explosion case 30 minutes, 3 explosions and immense panic and workers fleeing | एशियन फायर वर्क्स स्फोट प्रकरण: ३० मिनिटे, ३ धमाके अन् प्रचंड दहशत अन् कामगारांची पळापळ

एशियन फायर वर्क्स स्फोट प्रकरण: ३० मिनिटे, ३ धमाके अन् प्रचंड दहशत अन् कामगारांची पळापळ

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: ३० मिनिटात ३ जोरदार स्फोट झाले. आतमध्ये जागोजागी आग लागली. स्फोटामुळे जाडजूड साहित्य अन् भिंतीच्याही ठिकऱ्या उडाल्या. यावेळी कंपनीचे व्यवस्थापन हतबल होते तर आतमध्ये काम करणारे ३५ ते ४० कामगार जीव वाचविण्यासाठी इकडे तिकडे धावपळ करीत होते, अशी धक्कादायक माहिती प्रत्यक्षदर्शीच्या जबानीतून पुढे आली.

विशेष म्हणजे, आज ज्या ठिकाणी स्फोट झाला ती एशियन फायर वर्क्स नामक कंपनी अमिन सोहेल नामक व्यक्तीची आहे. स्फोट झाला त्यावेळी तेथे १५ महिलांसह २० ते २५ पुरूष कामगार काम करीत होते. यातील अनेकांनी 'लोकमत'शी बोलताना दुपारी १.३० ते २ वाजेपर्यंतचा थरार बोलून दाखविला. त्यावेळी अनेकांच्या अंगावर काटा आला होता. त्या अर्ध्या तासात एका पाठोपाठ तीन स्फोट (धमाके) झाले. दोन ठिकाणी दोघे मरून पडले. जखमी ईकडे तिकडे विव्हळत होते. जेथे स्फोट झाला त्या रूमच्या एका भिंतीचे मलब्यात रुपांतर झाले. आजूबाजूच्या साहित्याला आग लागली. आम्ही प्रचंड दहशतीत होतो. कंपनीतून बाहेर पडण्यासाठी चारही दिशांनी दूर पळत सुटलो. सर्व महिला समोरच्या दारातून ५०० मिटर दूर असलेल्या शेतातील घरात जाऊन दडल्या. बाहेर पडल्यानंतरही आम्ही सहीसलामत आहोत, आमचे जीव वाचले, याची खात्री पटत नव्हती, असे अनेकांनी लोकमतला सांगितले.

कामगारांची दिलेरी

स्फोटानंतर आग लागल्याचे बघून वाघाचे काळीज असलेल्या काही कामगारांनी एकीकडे जखमींना मदत केली. दुसरीकडे तेथील उपकरणाचा वापर आणि पाण्याचा मारा करून आग विझवली. त्यानंतर बऱ्याच वेळेनंतर अग्निशमन दल, अँम्बुलन्स तेथे पोहचल्या.

हेल्मेट किंवा शूजही नाही

स्फोटकाचा (बारूद) व्यवसाय करणाऱ्या एशियन फायर वर्क्समध्ये कामगारांना किड्या-मुंग्यासारखे मृत्यूच्या जबड्यात झोकले जात होते. येथे त्यांना सुरक्षेसाठी हेल्मेट, शूज अथवा हातमोजे असे साधारण साहित्यदेखिल कंपनी प्रशासनाकडून दिले जात नव्हते. केवळ अँप्रोन आणि मास्क घालून महिला-पुरूष कामगारांकडून अत्यंत धोक्याचे काम करवून घेतले जात होते.

स्फोट आणि स्फोटके आणि कंपनी

उल्लेखनीय असे की, यापूर्वी हैदराबादसह देशभरातील विविध बॉम्बस्फोटात अमिन सोहेल यांच्या वेगवेगळ्या कंपनीतील स्फोटकांचे नाव जोडले गेले होते. ठिकठिकाणच्या स्फोट आणि स्फोटकांच्या संबंधाने तशी चाैकशीही यापूर्वी झाली होती.

स्फोटानंतर धावपळीत जखमी झाल्या महिला

या भीषण स्फोटानंतर कंपनीच्या बाहेर पडण्यासाठी धावपळ करणाऱ्या महिला मजूर अडखळून, एकमेकीच्या अंगावर पडून जखमी झाल्या. कुणाच्या पायाला, कुणाच्या हाताला तर कुुणाच्या पाठीला मार बसला. वर्षा अरुण हिंगाणे, सरला चाैधरी, शिलाबाई मरस्कोल्हे, आम्रपाली मेश्राम, निर्मला सोनवणे, सुरेखा धुर्वे आदींचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे, दुपारी २ ला जखमी झालेल्या या महिला कोणत्याही उपचाराविना कंपनीच्या गेटसमोर सायंकाळी ६ वाजेपर्यंत तशाच वेदना सहन करत बसून होत्या.

Web Title: Asian Fire Works explosion case 30 minutes, 3 explosions and immense panic and workers fleeing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.