मनोरुग्ण भावासाठी आश्रप्पा बनला कलियुगातील राम; १०८ दिवसांच्या वनवासानंतर हरविलेल्या भावाशी पुनर्मिलन
By नरेश डोंगरे | Updated: February 15, 2025 18:45 IST2025-02-15T18:45:20+5:302025-02-15T18:45:48+5:30
आदर्श बंधू प्रेमाचे अनोखे उदाहरण : 'लोकमत'ची साथ फळली

Ashrappa became the Ram of Kali Yuga for his mentally ill brother
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी कोणताही दोष नसताना श्रीरामाने १४ वर्षांचा वनवास भोगला. तत्पूर्वी आंधळ्या आईवडिलांना श्रावणबाळाने कावडीत बसवून तिर्थयात्रा घडविण्यासाठी पायपिट केली. प्रभू श्रीराम अन् श्रावणबाळ हे दोघेही त्यांच्या आदर्श वर्तनाने अजरामर ठरले. अर्थात ही दोन्ही उदाहरणे सत्युगातील आहे. सध्याच्या युगात भाऊ भावाचा अन् पूत्र आपल्या जन्मदात्याचा काळ बनल्याची अनेक उदाहरणे डोळ्यासमोर येतात. मात्र, मनोरुग्ण भावाला शोधण्यासाठी स्वत:च्या जिवाचे रान करणारा भाऊ अनोखाचा ठरावा.
आपल्या आदर्श वर्तनातून बंधू प्रेमाची मिसाल कायम करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आश्रप्पा बेंद्रे (वय ५७) असून, ते बुलडाणा जिल्ह्यातील वडव (लोणार) येथील रहिवासी आहेत. बेंद्रे यांचा लहान भाऊ ओंकार मनोरुग्ण आहे. त्याच्यावर नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी परवानगी दिल्यामुळे आश्रप्पांनी ओंकारला २९ ऑक्टोबर २०२४ ला सोबत घेतले अन् दिवाळी साजरी करण्यासाठी बुलडाण्याकडे निघाले. मात्र, सीताबर्डीतील गर्दीत काही क्षणासाठी आश्रप्पाच्या हातून ओंकारचा हात सुटला अन् घात झाला. ओंकार गर्दीतून दिसेनासा झाला. स्वत:ची चूक मानत त्यांनी प्रायश्चित करण्यासाठी स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवले अन् वेडावल्यागत ओंकारला शोधण्यासाठी त्यांनी मंदीर, मशिद, गुरुद्वारा, विहारासह जत्रा, मेळा, अशी गर्दीची सारिच ठिकाणं पिंजून काढली. मात्र, ओंकार मिळतच नव्हता.
'लोकमत'कडून मदतीचा हात
वेशभूषा, केशभूषा सारेच विसरून भावाच्या विरहाने वेडेपिसे झालेले आश्रप्पा २ ऑक्टोबर २०२४ ला एका गर्दीच्या ठिकाणी लोकमतच्या प्रस्तूत प्रतिनिधीला दिसले. आश्रप्पाची विषन्न करणारी कैफियत ऐकल्यानंतर लोकमतने ३ डिसेंबर २०२४ च्या अंकात 'हरवलेल्या भावाचा झपाटल्यागत शोध घेणाराच वेडापिसा' या मथळ्याखाली ठळकपणे बातमी प्रकाशित केली. पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देऊन ओंकारचा शोध घेण्यासाठी समांतर यंत्रणेची आश्रप्पाला साथ मिळवून दिली.
अन् आजूबाजूचे सारेच निशब्द झाले
मनोरुग्णाचा शोध घेणाऱ्या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सुमंत ठाकरे यांच्याशी आश्रप्पाचा संपर्क करून दिल्यानंतर ठाकरेंनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ओंकारचा शोध चालविला. अखेर आज शनिवारी सकाळी त्यांना 'ओंकार यवतमाळच्या नंदादीप मध्ये' असल्याचे कळले. त्यांनी आश्रप्पाला घेऊन तातडीने यवतमाळ गाठले. तब्बल १०८ दिवस ज्याच्यासाठी जिवाचे रान केले, तो ओंकार समोर दिसताच आश्रप्पांनी हंबरडा फोडला. ओंकारलाही भावना कळली. दोन्ही भाऊ एकमेकांना घट्ट बिलगले. भावनांसोबतच अश्रूंचाही बांध फुटला अन आजूबाजूचे सारेच निशब्द झाले.