आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी नागपुरात केला रास्ता रोको,पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 20:15 IST2019-09-09T20:13:34+5:302019-09-09T20:15:53+5:30
सोमवारी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू) ने व्हेरायटी चौकात रास्तारोको करून जेलभरो आंदोलन केले.आंदोलनात दोन हजाराच्या जवळपास महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.

आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी नागपुरात केला रास्ता रोको,पोलिसांकडून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण आणि शहरी आरोग्य यंत्रणेत सेवा देणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तक गेल्या सात दिवसांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकार दरबारी आवाज उचलत आहे. सोमवारी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू) ने व्हेरायटी चौकात रास्तारोको करून जेलभरो आंदोलन केले. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात दोन हजाराच्या जवळपास महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.
आशा स्वयंसेवकांना २५०० तर गटप्रवर्तकांना ८७२५ रुपये मानधन मिळते. आशा स्वयंसेवकाचे मानधन १० हजार करावे, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अशी मागणी संघटनेची आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. त्यांनी तीनपट मानधन वाढीचे आश्वासन दिले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष यांच्यासोबतही सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. २० ऑगस्ट रोजी मानधन वाढीसाठी आझाद मैदानावर निदर्शने केली होती. पण तोडगा निघाला नाही. सरकारजवळ अतिशय कमी वेळ आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे. त्यामुळे १२ सप्टेंबरच्या आत मानधन वाढीचा जीआर काढावा, अशी मागणी संघटनेची आहे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करून संघटना सरकारचे लक्ष वेधत आहे. सोमवारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे व महासचिव प्रिती मेश्राम यांच्या नेतृत्वात हजारोच्या संख्येने आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी व्हेरायटी चौकात ठिय्या दिला. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. परिणामी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मोठ्या संख्येने महिलांचा समावेश असल्याने आंदोलकांना ताब्यात घेताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. आंदोलनात रंजना पौनीकर, रूपलता बोबले, मंदा गंधारे, संगीता मेश्राम, पौर्णिमा पाटील, गीता मेश्राम, ज्योती कावरे, मंजुषा फटींग, संगीता राऊत आदींचा समावेश होता.