एसटीमध्ये तब्बल साडेसात हजार चालक आणि वाहकांची होणार कंत्राटी भरती; इतके मिळणार वेतन !
By नरेश डोंगरे | Updated: September 20, 2025 20:33 IST2025-09-20T20:32:17+5:302025-09-20T20:33:31+5:30
महामंडळाकडून भरतीचा टॉप गियर : प्रथमच जंबो भरती; प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून

As many as seven and a half thousand drivers and conductors will be recruited on contract basis in ST; This is how much salary they will get!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मणूष्यबळाच्या कमतरतेमुळे एसटी महामंडळाच्या विविध कार्यालयात सुरू असलेली घरघर आता संपणार आहे. सरकारने या संबंधाने महत्वाचा निर्णय घेतल्यानंतर एसटीकडून मणूष्यबळ भरतीचा टॉप गियर टाकला आहे. त्यानुसार, तब्बल साडेसात हजार चालक आणि वाहकांची कंत्राटी स्वरूपाने भरती केली जाणार आहे.
एसटीच्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, राज्य परिवहन महामंडळात कर्मचाऱ्यांचा कमालीचा तुटवडा आहे. खर्चाला परवडत नाही, ही सबब पुढे होत असल्याने तोकड्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर महामंडळाचा गाडा ओढला जात आहे. निवृत्तांची संख्या वाढत असताना नव्या कर्मचाऱ्यांची मात्र त्यात भर पडत नाही. अशात महामंडळाच्या ताफ्यात ८ हजार नवीन बसेस धावणार असल्याचे सांगितले जात आहे. या बसेसवर नवीन चालक, वाहकांची गरज भासणार आहे. त्यासाठी महामंडळाकडून १७ हजार, ४५० कर्मचाऱ्यांची जम्बो भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. हे सर्व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जाणार आहे. तसेच त्यांच्या भरतीची प्रक्रिया दसऱ्याचा मुहूर्त साधून घेण्यात आला आहे. एसटीच्या सहा प्रादेशिक विभागांमध्ये ई-निविदा प्रणालीद्वारे ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
३० हजार रुपये वेतन
कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार असली तरी वेतन मात्र ठिकठाक देण्याचे ठरले आहे. भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रत्येकी ३० हजार रुपयांपर्यंतचे वेतन मिळणार आहे.
या भरतीच्या माध्यमातून महामंडळ राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सुतोवाच एसटीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
फक्त 'त्यांना'च फायदा
एसटीकडून होणाऱ्या जंबो भरतीच्या प्रक्रियेमुळे अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असला तरी लाभार्थ्यांत फक्त चालक, वाहक आणि तांत्रिक (मेकॅनिक) कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. अन्य पदांची मात्र भरती होणार नसल्याचे शिर्षस्थ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.