तब्बल ७५ दिवस व्हेंटिलेटरवरच; १९ वर्षीय दिव्याची झुंज यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 09:10 IST2023-04-29T09:08:39+5:302023-04-29T09:10:10+5:30
तिच्या ‘जीबीएस’सोबतच्या लढाईत डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

तब्बल ७५ दिवस व्हेंटिलेटरवरच; १९ वर्षीय दिव्याची झुंज यशस्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (जीबीएस) या दुर्मिळ आजाराने १९ वर्षीय दिव्याच्या शरीरातील मांसपेशी कमजोर पडल्या. ‘पॅरालिसीस’मुळे दोन्ही हातपाय लुळे पडले. याचा प्रभाव श्वसन यंत्रणेवरही झाला. गंभीर स्थिती निर्माण झाल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवले. या दरम्यान फुफ्फुसांमध्ये ‘म्युकस ब्लॉक’, न्युमोनिया, कमी-जास्त रक्तदाब, डायरियाही झाला. दिव्याला वाचविण्यासाठी मेडिकलच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. दिव्यानेही काळाशी झुंज दिली. या यशस्वी संघर्षाच्या प्रवासात ७५ दिवसांनी ती व्हेंटिलेटरमधून बाहेर आली.
दिव्या अकोल्यातील असून, डिसेंबरमध्ये अचानक तिच्या हातापायांना पॅरालिसीस झाले. खासगी रुग्णालयातून ‘जीबीएस’ नावाच्या दुर्मिळ आजाराचे निदान झाले. तिच्यावर १५ दिवसांचा उपचाराचा खर्च १६ लाखांवर गेला. हालाखीच्या स्थितीतील आई-वडिलांवर शेती, दागिने विकण्याची वेळ आली; परंतु पैसे संपल्याने १५ जानेवारीला दिव्याला नागपूर मेडिकलमध्ये आणले. डॉक्टरांनी तातडीने वॉर्ड क्रमांक ५२ मधील ‘आयसीयू’मध्ये दाखल करून उपचार केले. दिव्याच्या दुर्मिळ आजारावरील औषधांचा खर्च मोठा होता. औषधाची एक बाटली सात ते आठ हजार रुपयांची होती. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत तिची नोंदणी करण्यात आली.
हातपाय हलविणे अशक्य, आता केला नमस्कार
सलग चार महिने ती ‘आयसीयू’मध्ये असल्याने डॉक्टरांसह परिचारिकांची ती छोटी बहीण झाली. डॉक्टरांच्या उपचाराला ती प्रतिसाद देत होती. यामुळे ७५ दिवसांनी व्हेंटिलेटरमधून बाहेर आली. सुरुवातीला हातपाय हलविणेही अशक्य असलेल्या दिव्याने सोमवारी रुग्णालयातून घरी जाताना डॉक्टर, परिचारिकांना दोन्ही हातांनी नमस्कार केला. तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव होते.