Arvind Kejriwal: महाराष्ट्रातील सरकारी शाळा, रुग्णालयांच्या दुरवस्थेवरून केजरीवालांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 18:39 IST2022-05-08T18:39:09+5:302022-05-08T18:39:52+5:30
Arvind Kejriwal Criticize Maharashtra Government: अरविंद केजरीवाल यांनी आज आम आदमी पक्षाचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा मांडताना महाराष्ट्रातील शाळा आणि रुग्णालयांच्या स्थितीवरून महाराष्ट्र सरकार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Arvind Kejriwal: महाराष्ट्रातील सरकारी शाळा, रुग्णालयांच्या दुरवस्थेवरून केजरीवालांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले...
नागपूर - पंजाबमधील ऐतिहासिक विजयानंतर अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्यासाठी आपकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी आज नागपूरमध्ये लोकमतच्या कार्यक्रमात आम आदमी पक्षाचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा मांडताना महाराष्ट्रातील शाळा आणि रुग्णालयांच्या स्थितीवरून महाराष्ट्र सरकार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, सध्या राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, चोरी असं चित्र बनलं आहे. पण आम्हाला गुंडगिरी, दंगे करता येत नाही. आम्हाला शाळा, रुग्णालये बनवता येतात. मी तुम्हाला दिल्लीत आमंत्रित करतो शाळा, महाविद्यालये पाहण्यासाठी दिल्लीत या. तेथील सुविधा पाहा. महाराष्ट्रातही सरकारी शाळांची दुरवस्था झालेली आहे. झालेली आहे की नाही? दिल्लीमध्येही तशीच परिस्थिती होती. मुले शाळेत येत नव्हती. मुलं आली तरी परत जायची. शिक्षक शिकवत नव्हते. रिझल्टही वाईट यायचा. पण आज दिल्लीतील सरकारी शाळा एवढ्या सुधरल्या आहेत की, यावेळी सरकारी शाळांचे १२वीचे निकाल हे ९९.७ टक्के लागले आहेत. खासगी शाळांनाही सरकारी शाळांनी मागे टाकले आहे. यावर्षी दिल्लीत चार लाख मुलांनी खासगी शाळामधून दाखले काढून सरकारी शाळेत प्रवेश घेतलाय. यात श्रीमंतांच्या मुलांचा समावेश आहे.
दिल्लीमध्ये आधी सरकारी रुग्णालयाची अवस्था वाईट होती. महाराष्ट्रातही सध्या तशीच परिस्थिती आहे ना. औषधे मिळत नाहीत. अनेक रुग्णालयात मशिनरी चांगली नाही. डॉक्टर बाहेर उपचार करायला सांगतात. मात्र आम्ही आता ही परिस्थिती बदलली आहे. आम्ही त्रिस्तरीय यंत्रणा सुरू केली आहे. मोहल्ला क्लिनिक सुरू केले हे. तिथे एक डॉक्टर बसवला आहे. चाचण्या, औषधे फ्री. त्यानंतर पॉलिक्लिनिक येथे आठ डॉक्टर असतात. त्यानंतर सुपरस्पेशालिटी आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिलट सुरू केली आहेत. मी रिपोर्ट देण्याचे आदेश दिले. आज दिल्लीतील लोक मोठ्या रुग्णालयात नाही तर सरकारी रुग्णालयात जातात. दिल्लीत दोन कोटी लोक राहतात. आम्ही दिल्लीतील सर्वांवर मोफत उपचारांची घोषणा केली आहे, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.