कलाविष्कारांचा ‘नवरंग’
By Admin | Updated: October 6, 2014 00:53 IST2014-10-06T00:53:34+5:302014-10-06T00:53:34+5:30
तरु णांच्या मनातील तारुण्यसुलभ भाव प्रकट करणारे गुजरातचे लोकप्रिय गरबा नृत्य, महाराष्ट्राच्या भूमितील गोंधळ नृत्य, पंजाबचे भांगडा नृत्य, वरु णराजाला प्रसन्न करण्यासाठी सादर करण्यात येणारे

कलाविष्कारांचा ‘नवरंग’
लोकनृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : तरु णांच्या मनातील तारुण्यसुलभ भाव प्रकट करणारे गुजरातचे लोकप्रिय गरबा नृत्य, महाराष्ट्राच्या भूमितील गोंधळ नृत्य, पंजाबचे भांगडा नृत्य, वरु णराजाला प्रसन्न करण्यासाठी सादर करण्यात येणारे कर्मानृत्य, शेतकरी नृत्य, मुंबईतील कोळी बांधवांचे पालखी नृत्य आदी पारंपरिक आणि लोकसंगीताचा बाज असणाऱ्या नृत्यांनी बुधवारी नवरंगात रंग भरले.
निमित्त होते लोकमत युवा नेक्स्ट व सोमलवार निकालस महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धेचे. ‘नटरंग’ या शिर्षकाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेत शहरातील विविध महाविद्यालयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्घाटनप्रसंगी डॉ. डी. आर. पांडे, सतीश मानकर, राजेंद्र आष्टनकर, प्राचार्य डॉ. नंदिनी जठार, डॉ. सीमा सोमलवार उपस्थित होते.
‘मधुबन मे राधिका नाचे रे’ या नृत्याने स्पर्धेला सुरुवात झाली. हे नृत्य सोमलवार निकालस महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी सादर केले. ‘रंगीलो मेरे ढोलना’ या गाण्यावर डी.बी. नॅशनल नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी येताच एकच माहोल झाला. या नृत्यावर उपस्थितांनीही ठेका घेतला. सोमलवार निकाल महिला महाविद्यलयाने सादर केलेल्या ‘भांगडा’ नृत्याला रसिकांची चांगलीच दाद मिळली. संताजी महाविद्यालयाचा ‘गरबा’ नृत्य, ग्रीन हॅव्हन डीएड. कॉलेजचा ‘गोंधळ’ तर युथ कला निकेतन महाविद्यालयाच्या ‘आदिवासी’ नृत्याने स्पर्धेत चुरस आणली. सकाळपासूनच महाविद्यालयाच्या सभागृहातील वातावरण लोकसंगीताने भारून गेले होते. ढोलकी, हार्मोनियम, झांज, टाळ, डफ, टिमकी, बासरी आदी वाद्यांच्या सुरावटीने विद्यार्थ्यांची पावले मुख्य सभागृहाच्या दिशेने वळत होती. एकाहून एक सरस नृत्यांमुळे बेभान झालेल्या विद्यार्थी आणि खुद्द प्राध्यापकांनाही नाचण्याचा मोह आवरत नव्हता.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून राजेश समर्थ आणि सविता मिश्रा यांनी काम पाहिले. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन वैशाली लोंढे तर आभार प्राची लाखे यांनी मानले.
या स्पर्धेचे प्रायोजक बॉयझन, हार्मोनी इव्हेन्ट्स व सोमलवार निकालस महिला महाविद्यालय होते. कार्यक्रमाला अॅड. एम. एल. सोमलवार, डॉ. महेश सोमलवार, सोमलवार अकॅडमी एज्युकेशन सोसायटीचे सदस्य रोहित सोमलवार आणि सुप्रिया कोलवाडकर, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते. (प्रतिनिधी)
युथ कला निकेतन महाविद्यालयाने मारली बाजी
प्रथम पुरस्कार (तीन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह) युथ कला निकेतन महाविद्यालयाने पटकाविले. द्वितीय पुरस्कार (दोन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह) सोमलवार निकालस महिला महाविद्यालयाने तर तृतीय पुरस्कार (एक हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह) संताजी महाविद्यालयाने मिळविला. उत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार ग्रीन हेवन बीएड कॉलेजला मिळाला.