अर्णवची अटक ही सरकारची ठोकशाही : भाजपचा आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 22:30 IST2020-11-04T22:28:40+5:302020-11-04T22:30:35+5:30

BJP aggressive on Arnav arrest टीव्ही संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत अर्णवची सुटका होत नाही तोपर्यंत भाजपचे नेते हाताला काळ्या पट्ट्या बांधून किंवा काळ्या टोप्या घालून निषेध करतील.

Arnav's arrest is a suppression of the government: BJP's aggressive stance | अर्णवची अटक ही सरकारची ठोकशाही : भाजपचा आक्रमक पवित्रा

अर्णवची अटक ही सरकारची ठोकशाही : भाजपचा आक्रमक पवित्रा

ठळक मुद्देसुटका होईपर्यंत काळ्या पट्ट्या बांधून निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : टीव्ही संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत अर्णवची सुटका होत नाही तोपर्यंत भाजपचे नेते हाताला काळ्या पट्ट्या बांधून किंवा काळ्या टोप्या घालून निषेध करतील. गोस्वामी यांना ज्या पद्धतीने अटक झाली ती अयोग्य बाब आहे. राज्यात चाललेले असे प्रकार ही सरकारची ठोकशाहीच आहे, असा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावला. नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

अन्वय नाईक प्रकरण हे जुने आहे. त्याची फाईल बंद झाली होती, मात्र राजकीय पोळी शेकण्यासाठी गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. मात्र आपण काहीही करू व ते खपवून घेतले जाईल, या भ्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहू नये. गोस्वामी यांनी चुकीचे कृत्य केले असेल तर भाजप त्याचे समर्थन करणार नाही. मात्र त्यांना सराईत गुन्हेगाराप्रमाणे झालेली अटक अयोग्य आहे. संबंधित कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे. सरकारविरोधात जो बोलतो त्याच्यावर कारवाई करण्यात येते. ही एकप्रकारची आणीबाणीच आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. सरकारकडून सातत्याने प्रसारमाध्यमांवर करण्यात येणाऱ्या कारवाईचा मुद्दा घेऊन न्यायालयात जायचे का यासंबंधात आम्ही विचार करू. मात्र सरकार बधिर व दृष्टिहीन झाले आहे, असेदेखील पाटील म्हणाले. कांजुरमार्ग येथे मेट्रो शेड उभारण्यात येणाऱ्या जागेसंदर्भात सरकारने घटना व नियम पाळावे व ते अगोदर समजूनदेखील घ्यावे, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.

मुख्य मुद्द्यांना बगल दिली जात आहे

राज्यात शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. अतिवृष्टीमुळे तर हातातील पीक वाया गेले आहे. राज्यात महिलांवर अत्याचार वाढतच आहेत. शिक्षणाचा तर पार खेळखंडोबा झाला आहे. मात्र मुख्य मुद्द्यांना बगल दिली जात असून सरकार लक्ष भरकटविण्यासाठी विविध प्रकार करत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

सरकारविरोधात निदर्शने

दरम्यान, अर्णव गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या नेत्यांनी निदर्शने केली. टिळक पुतळा येथे झालेल्या आंदोलनादरम्यान काळा मास्क, टोप्या घालून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके, आ.अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित होते.

भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पत्रकार अर्णव गोस्वामीला अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी दुपारी महाल येथील टिळक पुतळा चौकात भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गोस्वामीच्या अटकेच्या विराेधात निदर्शने केली. गणेशपेठ पोलिसांनी परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्या रामभाऊ आंबुलकर, पारेंद्र पटले, स्वप्निल निमकर, आकाश भेदे, रामचंद्र दहीकर, अमर धरमारे, सूरज बनसोड, उदय हुमणे, अर्चना डेहनकर, मनीषा कोठे, श्रद्धा पाठक, कविता इंगळे यांच्यासह ४० ते ५० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Arnav's arrest is a suppression of the government: BJP's aggressive stance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.