फुटपाथवर पाय पसरून बसल्यावरून वाद, तरुणाला चाकूने भोसकून जीव घेण्याचा प्रयत्न
By योगेश पांडे | Updated: April 30, 2024 15:53 IST2024-04-30T15:49:49+5:302024-04-30T15:53:06+5:30
Nagpur : तीन आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न

Argument over sitting cross-legged leads to attempt to murder
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुटपाथवर पाय पसरून बसलेल्या तरुणाशी त्या मुद्द्यावरून वाद घालत तीन आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सोहेल शेख जाकीर शेख (२२, मेहबूबपुरा) असे जखमीचे नाव आहे. तो फर्निचरचे काम करतो. रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तो त्याचा मित्र सोनूसोबत टिपू सुलतान चौकातील पानठेल्यासमोरील फुटपाथवर बसला होता. त्यावेळी तेथे सैयद जैद अली नवाब अली (२०, मेहबुबपुरा), अब्दुल हक अब्दुल खालिद (२०, पवननगर), असलम खान मन्सुर खान (२०, यशोधरानगर) हे आले. ते सोहेलच्या ओळखीचेच होते व त्यांनी त्याला पाय हटवायला सांगितला. सोहेलने पाय हटविल्यावरदेखील आरोपी त्याच्याशी वाद घालायला लागले. त्यांनी त्याला शिवीगाळ केल्यावर सोहेलने विरोध केला. यावरून आरोपींनी त्याला मारहाण केली व सैयदने अब्दुलजवळून चाकू घेऊन सोहेलचे पोट, गळा व दोन्ही हातांवर वार करत जखमी केले. आरडाओरड झाल्याने आरोपी तेथून फरार झाले. सोहेलला मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून तिनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली.