आईला शिवीगाळ करण्यावरून वाद, विरोध करणाऱ्या धाकट्याची मोठ्या भावाकडून हत्या
By योगेश पांडे | Updated: April 28, 2024 23:14 IST2024-04-28T23:12:54+5:302024-04-28T23:14:09+5:30
गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे (३५, टिमकी) असे मृतकाचे नाव आहे तर दिलीप सुरेश गोखे (५१, टिमकी) असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे. दोघेही एकाच घरी खाली वर रहायचे. दिलीपची बायको त्याला सोडून गेली असून त्याला दारूचे व्यसन आहे.

आईला शिवीगाळ करण्यावरून वाद, विरोध करणाऱ्या धाकट्याची मोठ्या भावाकडून हत्या
नागपूर : आईला शिवीगाळ करण्यावरून वाद झाल्यावर विरोध करणाऱ्या सख्ख्या लहान भावाची मोठ्या भावाने हत्या केली. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. क्षणिक वादातून संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे (३५, टिमकी) असे मृतकाचे नाव आहे तर दिलीप सुरेश गोखे (५१, टिमकी) असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे. दोघेही एकाच घरी खाली वर रहायचे. दिलीपची बायको त्याला सोडून गेली असून त्याला दारूचे व्यसन आहे. तो वरच्या मजल्यावर राहतो. तर गौरव हा त्याच्या आईसोबत तळमजल्यावर रहायचा. रविवारी दिलीप दारू पिऊन घरी आला व आरडाओरड करू लागला. त्याच्या आईने त्याला समजविले असता त्याने तिलाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात व दारूच्या नशेत त्याने तिच्यावर वीट उगारली. हे पाहून गौरव संतापला व त्याने विरोध केला. त्यामुळे दिलीप आणखी संतापला. तू आता शांत बसला नाही तर तुझा जीवच घेईन असे म्हणत तो वरच्या मजल्यावर गेला. तेथून त्याने मोठा चाकू आणला व त्याने गौरवच्या गळ्यावर वार केला.
चाकू श्वसननलिकेवरच लागल्यामुळे गौरवचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याची माहिती तहसील पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी आरोपी दिलीपला अटक केली आहे. दिलीपने चौकशीदरम्यान केवळ लहान भावाला घारबविण्यासाठी चाकू त्याच्याजवळून फिरविण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून दोन्ही भावांच्या आईला तसेच कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.