लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी भूमिगत कोळसा खाणीस कोळसा मंत्रालयाच्या कोल कंट्रोलर संघटनेकडून काम सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाला वन विभागाची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची मंजुरी आधीच मिळालेली आहे. अदानी समूहाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, उत्खनन सुरू झाल्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या २५०० हून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. बांधकाम टप्प्यात ग्रामीणांना यंत्रसामग्री, ट्रॅक्टर आणि वाहन पुरवठा अशा कामांमध्ये रोजगार मिळेल, ज्यामुळे स्थानिक उत्पन्नाला चालना मिळेल. प्रकल्पातून राज्याला रॉयल्टी, कर व शुल्काच्या स्वरूपात महसूल मिळणार आहे.
पर्यावरण संरक्षणासाठी शून्य सांडपाणी विसर्ग प्रणाली राबविण्यात येईल आणि अतिरिक्त पाणी परिसरातील गावांसाठी सिंचनाकरिता उपलब्ध करून दिले जाईल. प्रारंभीच्या काही वर्षांत ५ हजार देशी झाडे लावली जातील. सामाजिक उपक्रमांतर्गत शिक्षण, आरोग्य, उपजीविका आणि ग्रामीण पायाभूत सुविधांवरही काम होईल.
पुनर्वसनाची गरज नाही
प्रकल्पात पारंपरिक खुल्या खाणीच्या (ओपन-कास्ट) पद्धतीऐवजी लाँगवॉल भूमिगत तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. केवळ १८ हेक्टर जमीन उत्खनन व हिरवळ पट्टा विकासासाठी वापरली जाणार असून उर्वरित जमीन जसाच्या तशीच राहील. अभ्यासानुसार पृष्ठभागावर धक्का बसण्याची शक्यता नाही, त्यामुळे पुनर्वसनाची आवश्यकता भासणार नाही, असा दावा करण्यात येत आहे.
३० वर्षे होणार उत्खनन
गोंडखैरी ब्लॉक गोंडखैरी, कलंबी, सुराबर्डी आणि वडधामना यांसह आठ गावांमध्ये पसरलेला आहे. ८६२ हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेल्या या खाणीत एकूण ९८.५ दशलक्ष टन कोळशाचा साठा आहे, ज्यापैकी सुमारे ४२.९ दशलक्ष टन कोळसा काढता येणार आहे. खाणीचे अंदाजित आयुष्य ३० वर्षे असे ठरविण्यात आले आहे.