वन मुख्यालयाच्या बोगस लेटर हेडवर वनरक्षक पदाची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:01 IST2025-01-08T16:55:14+5:302025-01-08T17:01:20+5:30
Nagpur : सदर पोलिस स्टेशनमध्ये केली तक्रार

Appointment of forest guard on bogus letter head of forest headquarters
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर मुख्यालयाच्या नावाने बनावट लेटर पॅडवर एका तरुणाला वनरक्षक पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित युवक हे नियुक्तीपत्र घेऊन मुख्यालयी पोहोचला होता. हा बोगस नियुक्ती आदेश पाहून वनविभागात मंगळवारी खळबळ उडाली. बोगस लेटर हेडच्या आधारे नोकरी देण्याचे रॅकट सक्रिय असल्याच्या संशयावरून वनविभागाने ताबडतोब सदर पोलिस स्टेशनमध्ये लिखित तक्रार दाखल केली आहे.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील सांगवी रेल्वे निवासी चेतन मोहन जाधव नामक तरुण वन मुख्यालयाच्या लेटर हेडवर मिळालेले नियुक्तीपत्र घेऊन रामगिरी रोड, सिव्हिल लाईन्स येथे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्या वनभवन येथील कार्यालयात पोहोचला. त्याला गोंदिया वनविभागांतर्गत वनरक्षक पदावर नियुक्तीपत्र देण्यात आले होते. चेतन जाधवला हे नियुक्तीपत्र १६ डिसेंबर २०२४ रोजी देण्यात आले व गोंदिया वनविभागात रुजू होण्यासाठी पाठविण्यात आले होते. तो गोंदियालाही पोहोचला. त्याचे नियुक्तीपत्र पाहून तेथील अधिकारीही बुचकळ्यात पडले. मात्र कथित नियुक्तीपत्र पाहून गोंदिया वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही संशय आला. त्यांनी जाधव याला पत्र घेऊन नागपूर येथील वन मुख्यालयात जाण्याचा सल्ला दिला. नागपुरातील वन मुख्यालयात कथित नियुक्तीपत्राची तपासणी केली असता ते बोगस असल्याचे आढळून आले.
या घटनेमुळे वन मुख्यालयाच्या बोगस लेटर पेंडद्वारे वनविभागात नोकऱ्या देण्याचा दावा करणारे रॅकेट सक्रिय आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. यानंतर उपवनसंरक्षक (मानव संसाधन प्रशासन) वन मुख्यालय यांच्यावतीने सदर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आलेला युवक सत्य लपवीत आहे काय?
या तरुणाने त्याच्या व्हॉट्सअॅपवर हे बोगस नियुक्तीपत्र आल्याची माहितीही वन मुख्यालयाला दिली आहे. त्यामुळे युवक सत्य लपवत असल्याचा संशय आहे. यासोबतच सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेल्या उपरोक्त पत्राची माहितीही समोर येत आहे.