आता १५ मेपर्यंत भरता येणार शिष्यवृत्तीसाठी अर्ज
By आनंद डेकाटे | Updated: May 3, 2024 16:27 IST2024-05-03T16:25:14+5:302024-05-03T16:27:44+5:30
Nagpur : शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते

Applications date for the scholarship is extended now till 15th May
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडिबीटीच्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर संकेतस्थळावर अनुसूचित जाती प्रवर्गातील शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याकरीता १५ मेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने ही अंतिम मुदतवाढ दिलेली आहे. नागपूर विभागातील महाविद्यालयामध्ये सन २०२३-२४ मध्ये प्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तात्काळ https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत. विभागातील सर्व महाविद्यालयांनी सन २०२२-२३ व २०२३-२४ शैक्षणिक सत्रातील महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असणारे अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत. महाडिबीटीच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन नूतनीकरणाचे अर्ज तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगिनमधील त्रुटी पुर्ततेसाठी सेंड बँक केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी त्वरीत त्रुटीपुर्तता करुन जिल्हा लॉगिनवर पाठविण्यात यावे. विहित वेळेत अर्ज सादर करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील.
महाडिबीटी संकेतस्थळावर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांना नूतनीकरणाचे अर्ज भरुन रि-अप्लाय करण्यासाठी आणि सेंड बॅक केलेल्या अर्जाची त्रुटी पुर्तता करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.