२८९ फेऱ्या सोडूनही ३० गावे एसटीपासून वंचित
By Admin | Updated: December 14, 2014 00:40 IST2014-12-14T00:40:35+5:302014-12-14T00:40:35+5:30
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यासाठी विविध ठिकाणांहून दर दिवशी एसटीच्या २८९ फेऱ्यांची वाहतूक होत असली तरीही तालुक्यातील ३० गावात अद्याप एसटी पोहोचू शकली नाही.

२८९ फेऱ्या सोडूनही ३० गावे एसटीपासून वंचित
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यासाठी विविध ठिकाणांहून दर दिवशी एसटीच्या २८९ फेऱ्यांची वाहतूक होत असली तरीही तालुक्यातील ३० गावात अद्याप एसटी पोहोचू शकली नाही.
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यावरून ही बाब उघड झाली आहे. दुर्गम भागात रस्त्याचीच सोय नसल्याने तेथे एसटीची सोय उपलब्ध करून देणे अवघड असल्याचे परिवहन खात्याने स्पष्ट केले आहे.नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात एकूण ९७ गावे आहेत. त्यापैकी ६७ गावांपर्यंतच एसटीची सेवा उपलब्ध आहे. ३० गावात एसटी पोहोचू शकली नाही. या गावातील नागरिकांना आणि विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना नजीकच्या दोन-तीन किलोमीटर परिघातील गावात जाऊन एसटी पकडावी लागते. अशा वेळी त्यांना खाजगी वाहनांशिवाय पर्याय उरत नाही. ग्रामीण भागात खाजगी प्रवासी वाहनांची अवस्था दयनीय आहे. जनावरे कोंबावीत असे प्रवासी त्यात कोंबले जातात. त्यातून अनेक वेळा अपघातही झाले आहेत.
कळमेश्वर तालुक्यासाठी नागपूरमधील गणेशपेठ, सावनेर, काटोल या आगाराद्वारे एसटी बसेस सोडल्या जातात. नागपूर येथून १२९, सावनेर येथून ५६, काटोल येथून १०४ फेऱ्या सोडल्या जातात. ज्या गावात एसटीजात नाही त्या भागातील शालेय विद्यार्थ्यांना नजीकच्या बसथांब्याद्वारे सवलतीच्या दरातील पासेस उपलब्ध करून देण्यात आल्याचेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)