नागरिकांना आणखी एक शॉक, एक रुपयापर्यंत वीज महाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:17 IST2025-02-19T11:16:26+5:302025-02-19T11:17:30+5:30
Nagpur : फेब्रुवारीत २.७० ग्राहकांकडून वसूल करणार ५२७.७३ कोटी

Another shock to citizens, electricity becomes expensive by up to one rupee
कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधीच वीज दराने त्रस्त महाराष्ट्रातील लोकांना पुन्हा शॉक दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश वीज नियामक आयोगाने महावितरणला त्यांच्या सुमारे २ कोटी ७० लाख ग्राहकांकडून ५२७ कोटी ७३ लाख रुपये इंधन समायोजन शुल्क वसूल करण्यास परवानगी दिली आहे. याचा फटका प्रत्येक श्रेणीतील ग्राहकांना बसणार आहे. घरगुती वीज ग्राहकांना तर प्रति युनिट एक रुपयापर्यंत अधिक पैसे द्यावे लागतील.
हवामान बदलामुळे नोव्हेंबर २०२४ मध्ये उकाडा होता. यामुळे विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. नियामक आयोगाने या वाढीचा अंदाज लक्षात घेता २२.२३ कोटींची अतिरिक्त वीज खरेदी करण्यास परवानगी दिली होती; परंतु लोडशेडिंग टाळण्यासाठी एकूण ५२७.७३ कोटी रुपयांची अतिरिक्त वीज खरेदी करावी लागली.
महावितरणने १७ डिसेंबर, ३ जानेवारी, ८ जानेवारी आणि १४ जानेवारी रोजी याचिका दाखल करून ग्राहकांवर एफएसी लावण्यासाठी आयोगाकडे परवानगी मागितली होती. आयोगाने ही मागणी मंजूर केली. त्यांच्या आदेशाने म्हटले आहे की नोव्हेंबर २४ मध्ये २ हजार दशलक्ष युनिट्स (एमयू) खरेदी अधिक झाली. त्यावर अतिरिक्त खर्च झाला. आता फेब्रुवारीच्या बिलात एफएसी लावून ग्राहकांकडून वसुली करणार आहे. याचा थेट परिणाम फेब्रुवारी आणि मार्चच्या वीज बिलांवर होईल. दुसरीकडे, १ एप्रिलपासून राज्यात नवीन वीज दर लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुनावणीला सुरुवात झाली आहे. तथापि, यापूर्वी महावितारानने ग्राहकांना जबर धक्का दिला आहे.
अल्प मुदत खरेदीचा परिणाम
महाविरणचा असा अंदाज आहे की, नोव्हेंबरमध्ये ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी इतर स्रोतांकडून वीज खरेदी करावी लागली. आयोगाची परवानगी नसताना ३.३५ रुपये प्रति युनिट दराने ७९३.०७ एमयू वीज खरेदी अल्प कालावधीत करावी लागली. त्याचप्रमाणे, खाजगी उत्पादकांकडून ३१९९.८१ एमयू, वीज घ्यावी लागली. परिणामी, अधिक वीज खरेदी करावी लागली.
किती पैसे द्यावे लागतील.
श्रेणी इंधन समायोजन शुल्क (प्रति युनिट)
घरगुती ग्राहक
बीपीएल १५ पैसे
० ते १०० युनिटस ४० पैसे
१०१ ते ३०० युनिट्स ७० पैसे
३०१ ते ५०० युनिटस ९० पैसे
५०० युनिट्सहून अधिक एक रुपया
एच.टी. औद्योगिक ५५ ते ७० पैसे
व्यावसायिक ६५ ते ९० पैसे
ईव्ही चार्जिंग ६५ पैसे
हॉस्पिटल / शैक्षणिक ५० ते ६५ पैसे