नागपुरात आणखी एक हिट ॲंड रन, कुटुंबाचा आधारच गेला
By योगेश पांडे | Updated: July 25, 2024 16:23 IST2024-07-25T16:21:53+5:302024-07-25T16:23:47+5:30
Nagpur : शतपावली करणाऱ्या व्यक्तीला अज्ञात कारने उडविले

Another hit and run in Nagpur, the support of the family is gone
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शतपावली करायला गेलेल्या एका व्यक्तीला अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारने उडविले व त्यात त्याचा मृत्यू झाला. संबंघित व्यक्तीच्या निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
संजय नितनवरे (४३, संत लहानुजीनगर) असे मृतकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सारिका (३५), १४ वर्षीय मुलगी व आठ वर्षीय मुलगा आहे. संजय हे गार्डनिंगची कामे करायचे. १२ जुलै रोजी रात्री जेवण केल्यावर सव्वा दहा वाजताच्या सुमारास ते शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. जरीपटका रिंग रोडवरील वोका बारसमोर त्यांना पांढऱ्या रंगाच्या ब्रेझा कारने धडक दिली. त्यात संजय गंभीर जखमी झाले. कारचालक तेथून फरार झाला.
घटनास्थळावरील लोकांनी संजय यांच्या मोबाईलमधूनच पत्नीला फोन केला. पत्नी व त्यांचे इतर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. जखमी अवस्थेत त्यांना ऑटोतून मेयो इस्पितळात घेऊन गेले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सारिका यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या १०६(१), २८१, १२५(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.