बाजारगाव शिवा फाटा येथे पुन्हा अपघात, भरधाव कार दुभाजकावर आदळली
By जितेंद्र ढवळे | Updated: September 6, 2023 13:51 IST2023-09-06T13:50:14+5:302023-09-06T13:51:52+5:30
अभियंत्यासह त्याची पत्नी जखमी

बाजारगाव शिवा फाटा येथे पुन्हा अपघात, भरधाव कार दुभाजकावर आदळली
नागपूर :नागपूर-अमरावती महामार्गावरील बाजारगाव नजीकच्या शिवा फाट्यावर बुधवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास पुन्हा अपघात घडला. यात अमरावती येथून नागपूरकडे जाणारी भरधाव कार अनियंत्रित झाल्याने ती दुभाजकावर आदळली. यात कारचालक प्रकाश हरी महाजन (६४) हे गंभीर तर त्यांच्या पत्नी विशाखा प्रकाश महाजन (५४) रा. अमरावती या किरकोळ जखमी झाल्या.
नागपूर-अमरावती महामार्गावरील बाजारगाव फाटा येथे आजवर ५० हून अधिक अपघात झाले आहेत. यात काही जणांचा जीवही गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश महाजन हे सॉफ्टवेअर अभियंता असून ते पत्नी विशाखा यांच्या सोबत एम.एच.-०१- ई.एफ. ७२१० क्रमांकाच्या कारने अमरावती येथून नागपूरकडे येत होते. बाजारगाव नजीकच्या शिवा फाटा येथे पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात प्रकाश महाजन यांचा कारच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने ती दुभाजकावर आदळली. त्यात महाजन हे गंभीर जखमी झाले तर त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटना स्थळाकडे धाव घेत दोघांनाही कार मधून बाहेर काढले. त्यांना बाजारगाव येथील रुग्णवाहिकेद्वारे नागपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारा करिता पाठविण्यात आले. या प्रकरणी कोंढाळी पोलीस गुन्हा नोदविला असून पुढील तपास सुरू आहे.