Announce wet drought in Vidarbha: Vidarbha state agitation committee | विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा : विदर्भ राज्य आंदोलन समिती
विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा : विदर्भ राज्य आंदोलन समिती

ठळक मुद्देराज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण विदर्भात कापूस, सोयाबीन व धान पिकांची अतिवृष्टीमुळे प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या मागणीचे निवेदन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
विदर्भातील शेतकऱ्यांचे जीवन कापूस, सोयाबीन व धान या मुख्य पिकांवर अवलंबून आहे. विदर्भाची अर्थव्यवस्थाही याच पिकांवर आधारित आहे. या तिन्ही पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. म्हणून संपूर्ण विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करून पिकांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जातून व विजेच्या बिलातून मुक्त करावे व हमी भावाचे सरकारी शेतीमाल खरेदी केंद्र तातडीने सुरु करावे, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
शिष्टमंडळात मुख्य संयोजक राम नेवले, सुनील वडस्कर, अरुण केदार, मुकेश मासुरकर, वृषभ वानखेडे, विष्णूजी आष्टीकर, विजय मौंदेकर, मुलाबराव धांडे, बाबा राठोड, अरुण खंगार, सुमित तागडे आदींचा समावेश होता.

Web Title: Announce wet drought in Vidarbha: Vidarbha state agitation committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.