Animal barrier in the path of Ganesh devotees | गणेश भक्तांच्या मार्गात जनावरांचा अडथळा
गणेश भक्तांच्या मार्गात जनावरांचा अडथळा

ठळक मुद्देशहरातील मार्गावर ठाण : वर्दळीच्या भागात अपघाताचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्ती बघण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. शहरातील अर्धवट सिमेंट कांक्रिट रोडमुळे आधीच वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यात आता मोकाट जनावरांची भर पडली आहे. शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत मार्गावरही जनावरे ठिय्या मांडतात. यामुळे मूर्ती बघण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.
नागपूर शहरात १५ ते १६ हजार जनावरे आहेत. बहुसंख्य गोपालक जनावरांना मोकाट सोडतात यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होण्यासोबतच शेणामुळे रस्त्यांवर घाण पसरते. याला आळा घालणारी सक्षम यंत्रणा महापालिकेकडे नाही. इंदोरा, अजनी, झिंगाबाई टाकळी, पारडी, वर्धमानगर, महाल, अंबाझरी ते अमरावती रोड, फुटाळा तलाव परिसर, मानेवाडा रोड, सक्करदरा, गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, सोनेगाव व वाठोडा यासह शहराच्या विविध भागात मोकाट जनावरांचा वावर आहे.
जनावरे मोकट सोडली म्हणून पशुपालकांवर कारवाई केली जात असल्याचा दावा महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात कारवाई करण्यासाठी या विभागाकडे सक्षम यंत्रणाच नाही. मनुष्यबळ व वाहनांचा अभाव असल्याने कारवाईला मर्यादा आहेत. मोकाट जनावरांमुळे रहदारीला अडथळा होण्यासोबतच घाणीची समस्या निर्माण झाली आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर घाण करणाऱ्या कुत्र्यांना व जनावरांना आळा घालण्याची जबाबदारी उपद्रव शोध पथकावर सोपविण्यात आल्याचा दावा केला जातो. परंतु या पथकांकडे अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, घाण पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या पथकाकडून पुन्हा मोकाट जनावरांच्या गोपालकांचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविल्यास ही समस्या सुटणार नाही.
दंड आकारूनही समस्या कायम
पशुपालकांनी जनावरे मोकाट सोडू नये यासाठी पहिल्या वेळेस त्यांना दंड आकारला जातो. मात्र दुसऱ्यांदा त्याच पशुपालकाने जनावर मोकाट सोडल्याचे आढळून आल्यास दंड आकारून गुन्हा दाखल करण्याची तरतूद नागरी क्षेत्रात जनावरे पाळणे व त्याची ने-आण करण्याबाबतच्या १९७६ च्या कायद्यात आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. फक्त दंड आकारण्याची कारवाई केली जात असल्याने समस्या कायम आहे.
पावसाळ्याच्या दिवसात समस्या गंभीर
पावसाळ्याच्या दिवसात जनावरे कोरड्या जागेत ठिय्या मारतात. त्यामुळे रस्त्यांवरील कोरड्या जागेत जनावरे बसतात. गोपालक जनावरांना रात्रीलाही गोठ्यात बांधत नसल्याने ते रस्त्यावर बसून असतात. यामुळे अपघाताचा धोका असतो. पथदिवे बंद असल्यास अनेकदा दुचाकीस्वार जनावरांवर जाऊन जखमी होण्याच्या घटना घडतात.

Web Title: Animal barrier in the path of Ganesh devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.