कोविड संकटातील देवदुतांचा सत्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:53 IST2021-02-05T04:53:47+5:302021-02-05T04:53:47+5:30
नागपूर : कोविड १९ च्या काळात शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा-सुविधा पुरविणाऱ्या विविध संस्थांच्या ४०० प्रतिनिधींचा सत्कार मनपातर्फे ...

कोविड संकटातील देवदुतांचा सत्कार ()
नागपूर : कोविड १९ च्या काळात शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा-सुविधा पुरविणाऱ्या विविध संस्थांच्या ४०० प्रतिनिधींचा सत्कार मनपातर्फे रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
कोरोना संकट काळात जात, पंथ, धर्म याचा विचार न करता सर्वांनी अन्नदानाचे काम केले. मनपा, पोलीस, आरोग्य विभाग, आशा वर्कर यांच्यासह विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सेवाकार्य केले. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे, विद्यमान आयुक्त राधकृष्णन बी., तत्कालीन पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह कोरोना संकट काळात सेवाकार्य करणारे सर्वच अभिनंदनास पात्र आहेत. संकटाचा विचार करता महापालिकेने औषध बँक निर्माण करून उपचारासाठी गरीब रुग्णांना मदत करावी, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.
महापौर दयाशंकर तिवारी यांनीही कोरोना काळात मदतकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था, शासकीय विभाग, अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याची प्रशंसा केली. सर्वांच्या सहकार्यामुळेच या संकटावर मात करणे शक्य झाले.
स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी प्रास्ताविका केले. या वेळी आमदार गिरीश व्यास, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, मनपा विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, विधि सभापती धर्मपाल मेश्राम, बसपा पक्षनेता वैशाली नारनवरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनपा उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक आदी उपस्थित होते.