संततधारेमुळे प्राचीन शिवमंदिर कोसळले; तीन कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2022 19:22 IST2022-08-10T19:22:03+5:302022-08-10T19:22:46+5:30
Nagpur News गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंजीपेठेतील ३०० वर्षे जुने शिवमंदिर बुधवारी पहाटे पाच वाजता कोसळले. या मंदिराला लागूनच राहणाऱ्या तीन कुटुंबांचे घरही मंदिराच्या मलब्याखाली दबले.

संततधारेमुळे प्राचीन शिवमंदिर कोसळले; तीन कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त
नागपूर : गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंजीपेठेतील ३०० वर्षे जुने शिवमंदिर बुधवारी पहाटे पाच वाजता कोसळले. या मंदिराला लागूनच राहणाऱ्या तीन कुटुंबांचे घरही मंदिराच्या मलब्याखाली दबले. एका कुटुंबातील पती-पत्नी व चार वर्षांची चिमुकली देखील मंदिराच्या मलब्याखाली दबली होती. परंतु, स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेऊन दाखविलेल्या सतर्कतेमुळे चिमुकलीला तत्काळ बाहेर काढण्यात आले. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी तीन कुटुंबीयांचे संसार उद्ध्वस्त झाले.
स्थानिक लोकांनी सांगितल्यानुसार हे मंदिर अतिशय जुने आहे. मंदिराचा परिसर साडेसहा हजार चौरस फुटांचा असून, त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे मंदिर अतिशय जीर्ण झालेले होते व मंदिरावर मोठे झाडही होते. बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज करीत मंदिराचा जीर्ण भाग कोसळला.
मलब्याखाली दबले होते चारजण
मंदिराला लागूनच काही लोकांचे वास्तव्य होते. यातील तामलाल सागर, अनिल शेळके व जगदीश तेलंग यांचे घर जमीनदोस्त झाले, तर अनिल शेळके, त्यांची पत्नी सिमरन व चार वर्षांची मुलगी मेस्टी या मलब्याखाली दबले होते. मंदिर कोसळल्याचा आवाज परिसरातील लोकांना ऐकू येताच नागिरकांनी धाव घेतली. परिस्थितीची जाणीव होताच मलबा उपसून चौघांनाही सुखरूप बाहेर काढले. स्थानिक अभिलाष बक्सरे, आकाश मलिक, शंभू मलिक, अंकित समुद्रे, चेतन भगत व धर्मेंद्र मोरे यांच्यासह अनेकांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे जीवित हानी टळली.
प्रशासनाकडे मदतीची आस
सध्या प्रशासनाने या तीनही कुटुंबीयांना शेजारी असलेल्या समाजभवनात निवारा दिला आहे. या घटनेत सागर कुटुंबीयांचे घर जमीनदोस्त झाले. तामलाल सागर हे मजुरी करीत असून, त्यांना चार मुली आहेत. त्यामुळे हे कुटुंबीय प्रशासनाकडून मदतीची आस लावून आहे.
जीर्ण मंदिराकडे प्रशासनाचेही दूर्लक्ष
या मंदिरात कुठलीही कमिटी नाही. त्यामुळे मंदिराची डागडुजी व देखभाल करणारे कुणी नाही. शहरातील जीर्ण इमारतींना पाडण्यासाठी महापालिका प्रशासन नोटीस बजावते. परंतु, मंदिर जीर्ण झाले असताना व सभोवताली कुटुंब राहत असतानाही प्रशासनाकडून कुठलीही नोटीस देण्यात आली नसल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले.