शिवपुराण ऐकण्यासाठी आलेल्या वृद्ध महिलेस ट्रकने चिरडले
By दयानंद पाईकराव | Updated: October 21, 2023 15:22 IST2023-10-21T15:21:47+5:302023-10-21T15:22:06+5:30
भरधाव ऑटोतून पडल्या खाली : संघर्षनगर चौकातील घटना, ऑटो व ट्रकचालक झाले फरार

शिवपुराण ऐकण्यासाठी आलेल्या वृद्ध महिलेस ट्रकने चिरडले
नागपूर : शिवपुराण ऐकण्यासाठी जात असताना ऑटोचालकाने भरधाव ऑटो चालविल्यामुळे एक ६० वर्षीय वृ्द्ध महिला खाली पडली. तेवढ्यात बाजुने जाणाऱ्या ट्रकने त्या महिलेस चिरडले. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास संघर्षनगर चौकात घडली.
गिताबाई रमेश कावडे (वय ६०) असे या अपघातात मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या सोनु नरेंद्र नरवले (वय ३४) दोघी. रा. चांदोरी, मुंडीकोटा, ता. तिरोडी जि. गोंदिया येथून शिवपुराण ऐकण्यासाठी नागपुरात आल्या. दोघीही एच. बी. टाऊन चौकाजवळ बसमधून उतरल्या. तेथून त्या ऑटोने बहादुरा फाटा येथे कार्यक्रमस्थळी जात होत्या. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत संघर्षनगर चौकात ऑटोचालकाने त्याच्या ताब्यातील ऑटो निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून उजव्या बाजुला झुकविला. यामुळे गीताबाई ऑटोतून खाली पडल्या.
तेवढ्यात बाजुने जाणारा ट्रक क्रमांक एम. एच. ४९, ए. टी-६०४७ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून ट्रकचे समोरील चाक गीताबाई यांच्या अंगावरून नेले. यात गीताबाई यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ऑटोचालक आणि ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणी सोनु नरेंद्र नरवले यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी ऑटोचालक व ट्रक चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ), ३४, सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.