घराबाहेर कचरा टाकायला गेलेल्या वृद्धेचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
By योगेश पांडे | Updated: June 16, 2023 17:27 IST2023-06-16T17:27:06+5:302023-06-16T17:27:51+5:30
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

घराबाहेर कचरा टाकायला गेलेल्या वृद्धेचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
नागपूर : घराबाहेर कचरा टाकायला गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा भरधाव दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मोहिनी डोमाजी सातपुते (७२, जोशी वाडी, कुकडे ले आऊट) असे मृतक महिलेचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्या घरकाम आटोपून घरापलीकडच्या मार्गावर असलेल्या कचऱ्याच्या डब्यात कचरा टाकायला जात होत्या. त्याचवेळी एमएच ३१ डीए ४४७१ या क्रमांकाच्या दुचाकीवरून शैलेश अरविंद काळे (३७, श्यामनगर, बेलतरोडी) हा दुचाकीचालक वेगाने आला व त्याने मोहिनी यांना जोरदार धडक दिली.
या धडकेत त्या खाली पडल्या व गंभीर जखमी झाल्या. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील लोक घराबाहेर आले. मोहिनी जखमी अवस्थेत पडल्या होत्या. त्यांना मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचा मुलगा मिलींद याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला व आरोपी दुचाकीचालक शैलेश काळे याला अटक केली आहे.