अमरावतीच्या तरुणाचे नागपुरात अवयवदान; तिघांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2023 20:48 IST2023-06-06T20:48:18+5:302023-06-06T20:48:48+5:30
रस्ता अपघातात गंभीर जखमी होऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या पतीच्या दु:खात असतानाही त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी पुढाकार घेतला. या मानवतावादी निर्णयामुळे अमरावतीच्या या तरुणाचे मंगळवारी नागपुरात अवयवदान झाले.

अमरावतीच्या तरुणाचे नागपुरात अवयवदान; तिघांना जीवनदान
नागपूर : रस्ता अपघातात गंभीर जखमी होऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या पतीच्या दु:खात असतानाही त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी पुढाकार घेतला. या मानवतावादी निर्णयामुळे अमरावतीच्या या तरुणाचे मंगळवारी नागपुरात अवयवदान झाले. तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली.
अमरावती जिल्हा, तिवसा तालुक्यातील रत्नागिरी नगर रहिवासी नितेश मोहन खेकडे (३८) त्या अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, २१ मे रोजी नितेश आपल्या घरी जात होते. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करीत असतानाच भरधाव वेगात असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि नंतर न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र पाच दिवसांच्या उपचारानंतरही त्यांची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांच्या पथकाने त्यांना ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषित केले. डॉक्टरांनी याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देत अवयवदानाचा सल्ला दिला. त्या दु:खातही त्यांच्या पत्नी भारती, भाऊ राजेश आणि बहीण वैष्णवी बोभाटे यांनी अवयवदानाला संमती दिली.
हृदयासाठी रुग्णच मिळाला नाही
खेकडे यांच्या कुटुंबियांनी हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंड आणि कॉर्नियाची जोडीचे दान करण्याला मंजुरी दिली. नागपूरच्या ‘झेडटीसीसी’ने नियमानुसार हृदयासाठी राज्यात व राज्याबाहेर सूचना दिल्या. परंतु रुग्णच मिळाला नाही. दात्याचे एक मूत्रपिंड न्यू इरा हॉस्पिटलच्या एका ४७ वर्षीय पुरुष रुग्णाला, दुसरे मूत्रपिंड केअर हॉस्पिटलच्या ३८ वर्षीय पुरुष रुग्णाला, यकृत ५१ वर्षीय महिलेला तर, कॉर्निआची जोडी महात्मे आय बँकला दान करण्यात आली. या वर्षातील हे १२वे अयवदान होते.