अमितेश कुमार यांनी नागपुरातून क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 12:33 PM2020-09-03T12:33:14+5:302020-09-03T12:34:59+5:30

अर्थशास्त्र (इकॉनॉमिक्स) आणि सायबर कायद्याची मास्टरी बाळगणारे अमितेश कुमार नागपुरातील सायबर गुन्हेगारीवरही खास नजर ठेवणार आहेत.

Amitesh Kumar had created a stir in the world of cricket from Nagpur | अमितेश कुमार यांनी नागपुरातून क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली होती

अमितेश कुमार यांनी नागपुरातून क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली होती

googlenewsNext
ठळक मुद्देप्रभावी आणि परिणामकारक पोलिसिंग करणारसायबर क्राईमवर विशेष लक्ष !नवनियुक्त पोलीस आयुक्तांचा मनोदय

नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तसेच दाऊद इब्राहिमच्या हस्तकामध्ये होणारी बातचित टेप करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारे नागपूरचे तत्कालीन आयपीएस अधिकारी अमितेश कुमार शुक्रवारी नागपुरात आपल्या पदाची धुरा सांभाळणार आहेत. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरमध्ये प्रभावी आणि परिणामकारक पोलिसिंग करणार, असा मनोदय त्यांनी लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.

सध्याचे पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची बदली होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र येथे नवीन पोलीस आयुक्त कोण येणार याबाबत वेगवेगळी नावे चर्चेला होती. सर्वात आधी सुनील रामानंद यांचे नाव चर्चेला आले. त्यानंतर प्रभात कुमार, राजेंद्रसिंग यांच्याही नावाची चर्चा झाली आणि आज अखेर नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांच्या नावाची घोषणा झाली.
अमितेश कुमार यांनी २००५ ते २००७ अशी दोन वर्षे नागपूरला सेवा दिली आहे. त्यावेळी पोलीस आयुक्त म्हणून येथे शिवप्रतापसिंह यादव होते. नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना होता आणि वेस्ट इंडिजची चमू हॉटेल प्राईडमध्ये मुक्कामी थांबली होती. अष्टपैलू खेळाडू मार्लोन सॅम्युअल यांच्यासाठी हॉटेल प्राईडच्या लँडलाईनवर वारंवार कॉल येत असल्याचे लक्षात आल्यामुळे तत्कालीन पोलीस उपायुक्त अमितेश कुमार यांनी त्यावर नजर रोखली.

त्यांच्या समयसुचकतेमुळे जगभरातील क्रिकेट रसिकांना मोठा धक्का देणारी खळबळजनक बाब उघड झाली. अंडरवर्ल्ड डॉन तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा क्रिकेट बॅटिंगचा जगभरात गोरखधंदा सांभाळणारा राईटहॅण्ड मुकेश कोचर हा दुबईतून मॅच फिक्सिंगसाठी वारंवार मार्लोनसोबत संपर्क करत होता. हे लक्षात आल्यामुळे अमितेश कुमार यांनी हे संभाषण टेप करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. नंतर देश-विदेशातील तपास यंत्रणांनी या प्रकरणावर लक्ष वेधले होते. नागपूर पोलिसांच्या तपासाच्या आधारे आयसीसीने मार्लोन सॅम्युअल्स याच्यावर दोन वर्षाची बंदीही घातली होती.

दरम्यान हा प्रकार उघड केल्याबद्दल तत्कालीन पोलीस आयुक्त शिवप्रतापसिंह यादव आणि अमितेश कुमार यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्यानंतर अमितेश कुमार येथून बदलून गेले आणि आता १३ वर्षानंतर पोलीस आयुक्त म्हणून नागपुरात ते परत येत आहेत.
या संबंधाने ‘लोकमत’ने त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी नागपूरला प्रभावी आणि परिणामकारक सेवा देऊ, असा मनोदय जाहीर केला.

अर्थशास्त्र (इकॉनॉमिक्स) आणि सायबर कायद्याची मास्टरी बाळगणारे अमितेश कुमार नागपुरातील सायबर गुन्हेगारीवरही ही खास नजर ठेवणार आहेत. १३ वर्षांपूर्वी नागपुरातील स्थिती वेगळी होती. आताचे गुन्हेगारी स्वरूप बदलले आहे. त्यामुळे येथील परिस्थितीचा अभ्यास करून नंतर आपण आपली भूमिका ठरवू, असे ते म्हणाले. नागरिक आणि पोलिसांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासोबतच सर्वांना सोबत घेऊन आपण येथे काम करू, असे ते म्हणाले. शुक्रवारी आपण पदाची जबाबदारी स्वीकारू, असेही त्यांनी लोकमतला सांगितले.

 

Web Title: Amitesh Kumar had created a stir in the world of cricket from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.