Jhund Movie : मी जमिनीवरच.. 'झुंड'चा खरा नायक विजय बारसे यांनी व्यक्त केली भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 12:56 IST2022-03-04T12:45:18+5:302022-03-04T12:56:17+5:30
‘कॉमन’ माणसासाठी केलेल्या कॉमन माणसाची हीच कथा ‘झुंड’ घेऊन येत असल्याची माहिती प्रा. विजय बारसे यांनी दिली.

Jhund Movie : मी जमिनीवरच.. 'झुंड'चा खरा नायक विजय बारसे यांनी व्यक्त केली भावना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झुंड हा व्यक्तींचा समूह असतो. या समूहाला काही नियम घालून खेळाच्या मैदानावर उतरवले तर ती एक टीम होते. चोऱ्या करणारे, विविध व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या अशाच झुंडीला खेळाच्या माध्यमातून वळण लावून त्यांचा व्यक्तिगत विकास साधण्याचे काम आपण केले. ‘कॉमन’ माणसासाठी केलेल्या कॉमन माणसाची हीच कथा ‘झुंड’ घेऊन येत असल्याची माहिती प्रा. विजय बारसे यांनी दिली.
सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाच्या जीवनावर आधारित झुंड या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वत: ही भूमिका साकारली आहे. ज्यांच्या जीवनावर हा सिनेमा साकारला ते खरे नायक प्रा. विजय बारसे हे अनेक दिवसांनंतर नागपूरकरांसमोर भरभरून बोलले. निमित्त होते त्यांच्या नागरी सत्काराचे.
झुंड हा सिनेमा प्रदर्शित होत असल्यानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून गुरुवारी संविधान चौकात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रणजित मेश्राम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी यशवंत तेलंग होते. यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रा. विजय बारसे मनमोकळेपणाने बोलले. ते म्हणाले, आज सकाळपासून मला पत्रकारांना मुलाखती द्याव्या लागत आहेत. ‘साला मै तो साहब बन गया,’ अशी काहीशी अवस्था झाली आहे; पण मी कालही जमिनीवर होतो आणि आजही जमिनीवरच आहे. फुटबॉलच्या माध्यमातून झोपडपट्टीतील व्यक्तींचा विकास हा माझा मूळ उद्देश होता. चित्रपट होत असताना तो मूळ उद्देश बिघडायला नको, ही माझी अट होती. काल मी चित्रपट पाहिला. तेव्हा मला खरच खूप आनंद झाला. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांनी अतिशय तंतोतंत विजय बारसे उभा केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमिताभ बच्चन यांनी खऱ्या विजयची भूमिका निभावली आहे.
झुंड या चित्रपटाचे ८० टक्के शूटिंग नागपूरला झाले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव विजय आहे; परंतु त्यांनी आपल्या जीवनात कदाचित पहिल्यांदाच खऱ्या विजयची (विजय बारसे) यांची भूमिका निभावली ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रा. बारसे यांनी सांगितले.
नेल्सन मंडेला यांनी थोपटलेली पाठ हा जीवनातील सर्वोच्च सन्मान
दक्षिण ऑफ्रिकेत होमलेस वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला हाेता. त्यावेळी मलाही सन्मानार्थ बोलावण्यात आले होते. एका मोठ्या स्टेडियममध्ये कार्यक्रम होता. मी प्रेक्षकांमध्ये बसलो होतो. त्यावेळी दक्षिण ऑफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष व मानवतावादी नेते नेल्सन मंडेला यांनी ‘मुला तू खूप चांगले काम करीत आहे, असे म्हणत माझी पाठ थोपटली. तो माझ्या जीवनातील सर्वोच्च सन्मान असल्याचेही प्रा. बारसे यांनी यावेळी सांगितले.