'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी
By नरेश डोंगरे | Updated: April 13, 2026 23:57 IST2026-04-13T23:52:03+5:302026-04-13T23:57:03+5:30
Nagpur Crime news:

'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी
- नरेश डोंगरे, नागपूर
'अमिरो का नशा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नाईट लाईफची सवय जडलेल्या दिल्ली, मुंबई सारख्या भारतातील मोठ्या महानगरात प्रचंड मागणी असलेल्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहिती रविवारच्या कारवाईनंतर पुढे आली आहे. यामुळे एनसीबी आणि पोलिसांसह राज्यातील सर्वच प्रकारच्या तपास यंत्रणांचे कान उभे झाले आहेत.
दिल्लीहून बंगळुरूसाठी कोकेनची मोठी खेप घेऊन निघालेल्या एका महिलेला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर युनिटने अटक केली. तिच्याकडून ४ कोटी, २६ लाख रुपये किंमतीचे ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. ही कारवाई अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या मोठ्या तस्करांना हादरा देणारी ठरली आहे. दुसरे म्हणजे, या कारवाईमुळे तपास यंत्रणांही खडबडून जाग्या झाल्या आहेत.
अत्यंत महागडे आणि घातक ड्रग्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकेनची मागणी आणि पुरवठा प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, गोवा आणि हैदराबाद आणि अशाच मोठ्या महानगरांमध्ये केला जातो. त्याचमुळे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असलेल्या ड्रग्ज माफियांनी नाईट लाईफ, उच्चभ्रू जीवनशैली तसेच पार्टी कल्चरची सवय जडलेल्या मोजक्या महानगरांमध्ये आपले नेटवर्क प्रशस्त केले आहे.
या ड्रगची भारतातील नमूद महानगरात साधारणत: ८ ते २० हजार रुपये प्रति ग्राम दराने (दर्जा पाहून) किरकोळ (स्ट्रीट प्राइस) विक्री केली जाते. त्यामुळे सर्वसाधारण नशेडी महागड्या कोकेनची नशा करू शकत नाही. त्यामुळे याला 'अमिरों का नशा' म्हटले जाते. मोठ्या प्रमाणावर दिल्लीत कोकेनची खेप नियमित उतरते. वर्षभरापूर्वी तब्बल ७,६०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची कोकेन दिल्लीत जप्त करण्यात आली होती. तेव्हा कोकेनचे भारतातील सिंडिकेट हादरले होते. त्यानंतर त्यांनी देशाच्या विविध भागात कोकेनच्या तस्करीचे पर्यायी मार्ग शोधले.
बंगळुरू, हैदराबादची खेप नागपूरमार्गे
शिर्षस्थ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महागडी खासगी वाहने आणि रेल्वे गाड्यांनी नागपूर मार्गे बंगळुरू आणि हैदराबादमध्ये कोट्यवधींची कोकेन पोहचवली जाऊ शकते, हे लक्षात येताच या सिंडिकेटने तो प्रयोग सुरू केला. त्यामुळे नागपूरहून अनेक खेप गेल्याचीही चर्चा आहे.
मात्र, या तस्करीची कुणकुण लागताच नागपूर डीआरआयने सतत डोळ्यात तेल घालून 'कोकेन तस्करांच्या' नेटवर्कवर नजर रोखली. त्यानुसार, रविवारी हजरत निजामुद्दीन – केएसआर बंगळुरू राजधानी एक्सप्रेसमध्ये महिला तस्कराला ताब्यात घेऊन तिच्याकडून ४ कोटी, २६ लाखांचे कोकेन जप्त केले. या कारवाईचे वृत्त बहुतांश तपास यंत्रणांमध्ये खळबळ निर्माण करणारा ठरला आहे. आपल्याकडे हे इनपूट का नव्हते, असा प्रश्नही वरिष्ठ स्तरावर उपस्थित झाल्याचे वृत्त आहे.