दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगविरोधात आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन
By आनंद डेकाटे | Updated: July 1, 2024 18:37 IST2024-07-01T18:36:52+5:302024-07-01T18:37:46+5:30
राज्यभरातून हजारो अनुयायी दीक्षाभूमीवर धडकले, काम बंद पाडले : भूमिगत पार्किंग रद्द करण्याची समितीने केली घोषणा

Ambedkari followers rally against underground parking at Dikshabhoomi
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूमिगत पार्किंगमुळे भविष्यात स्मारक व बोधिवृक्षाला धोका होण्याची शक्यता असल्याने दीक्षाभूमीवर भूमिगत पार्किंगविरोधात आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी एल्गार पुकारला. भूमिगत पार्किंग नकोच? अशी आक्रमक भूमिका घेत सोमवारी राज्यभरातून हजारो आंबेडकरी समाजबांधवांनी दीक्षाभूमीवर धडक देत भूमिगत पार्किंगचे काम बंद पाडले. आंबेडकरी अनुयायांची तीव्र भावना लक्षात घेऊन दीक्षाभूमी स्मारक समितीने तातडीने भूमिगत पार्किंग रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. तसे लेखी पत्रही आंदोलकांना दिले, तसेच यासंदर्भात नोडल एजन्सी असलेल्या एनएमआरडीएला पत्रही लिहिले.
दीक्षाभूमीवर सौंदर्यीकरण व नवीनीकरणाच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी २१४ कोटी रूपये शासनाने मंजूर केले आहेत. त्यातील पहिल्या टप्प्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. या पहिल्या टप्प्यात दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगचा समावेश आहे; परंतु या भूमिगत पार्किंगलाच आंबेडकरी अनुयायांचा विरोध होता. भूमिगत पार्किंगमुळे भविष्यात अनेक धोके निर्माण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात स्मारक व बोधिवृक्षालाही धोका होण्याची शक्यताही समाजबांधवांकडून वर्तविली जात होती. यासंदर्भात दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने दोन बैठकी घेऊन समाजबांधवांची समजूत काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला, तसेच भूमिगत पार्किंग रद्द करण्याबाबत अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले होते; परंतु भूमिगत पार्किंग नकोच? ती रद्द करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी आंबेडकरी समाजाची भूमिका होती.
यासंदर्भात सोमवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलासह राज्यभरातील विविध आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायी सोमवारी सकाळपासूनच दीक्षाभूमीवर धडकले. सकाळी १० वाजेपासून कार्यकर्ते यायला सुरुवात झाली. राज्यभरातून हजारो अनुयायी पोहोचले. त्यांनी सुरुवातीला घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर भूमिगत पार्किंगच्या कामाच्या ठिकाणी जाऊन काम बंद पाडले. त्याची तोडफोड करीत जाळपोळ केली. यावेळी पोलिसांनी सामंजस्यांची भूमिका घेत आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला.
आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. जोपर्यंत समितीने पार्किंगबाबत निर्णय घेत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही, अशी भूमिका घेत हजारो अनुयायांनी दीक्षाभूमीवर ठाण मांडले. आंबेडकरी अनुयायांची आक्रमक भूमिका पाहता दीक्षाभूमी स्मारक समितीने येथील भूमिगत पार्किंगचे काम आजपासूनच रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले; परंतु आंदोलकांनी याबाबतचे लेखी आश्वासन मागितले. त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, माजी सचिव डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, डी.जी. दाभाडे यांनी यासंदर्भात आंदोलकांना लेखी आश्वासनाचे पत्र दिले, तसेच सर्व आंदोलकांसमोर त्या पत्राचे जाहीर वाचन करण्यात आले. त्यानंतर आंदोलक शांत झाले.