आंबेडकर जयंती घरीच साजरी करावी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 13:29 IST2020-04-06T13:29:04+5:302020-04-06T13:29:34+5:30
येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपापल्या घरीच साजरी करावी. आंबेडकर जयंतीच्या दिवशी कुणीही घराबाहेर जाऊ नये. सर्वांनी घरातच कुटंबातील सदस्यांसह बुद्ध वंदना घ्यावी. घरावर पंचशील ध्वज लावावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीने केले आहे.

आंबेडकर जयंती घरीच साजरी करावी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी भारतासह जगभरातील देशांनी लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे आपणही सरकारला सहकार्य करीत येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपापल्या घरीच साजरी करावी. हे राष्ट्र आणि मानव कल्याणासाठीही आवश्यक आहे. म्हणून आंबेडकर जयंतीचे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम संघटनांनी आयोजित करू नये. आंबेडकर जयंतीच्या दिवशी कुणीही घराबाहेर जाऊ नये. सर्वांनी आपापल्या घरातच कुटंबातील सदस्यांसह बुद्ध वंदना घ्यावी. घरावर पंचशील ध्वज लावावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीने केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीतर्फे दरवर्षी दीक्षाभूमीवर आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले जाते. परंतु यावर्षी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन १४ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्या दिवशी कुणीही दीक्षाभूमीवर जाऊ नये. संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी जाऊ नये. लोकांनी आपापल्या वस्त्या आणि विहारांमध्ये सुद्धा आंबेडकर जयंतीचा कुठलाही कार्यक्रम आयोजित करू नये. सर्व लोकांनी शांतता आणि संयम ठेवून आपापल्या घरातच आंबेडकर जयंती साजरी करावी, असे आवाहन आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीतर्फे डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. प्रदीप आगलावे, पी.एस. खोब्रागडे, डॉ. चंद्रशेखर गायकवाड, राजेश लोखंडे, प्रदीप नगराळे, अमन कांबळे, डॉ. अनिल हिरेखण, डॉ. बी. एस. गेडाम, डॉ. त्रिलोक हजारे, डॉ. सरोज आगलावे, डॉ. निकेतन जांभुळकर, डॉ. बोधी, राजेश रक्षित, सुरेश तामगाडगे आदींनी केले आहे.