आजीला सुई दिली तरी, तिला कळलेच नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST2021-03-15T04:07:37+5:302021-03-15T04:07:37+5:30
नागपूर : झालेले वय. कोरोनाची भीती. मागील काही वर्षांत न टोचलेली सुई. तरीही ती आजी एकटीच हातात आधारकार्ड घेऊन ...

आजीला सुई दिली तरी, तिला कळलेच नाही...
नागपूर : झालेले वय. कोरोनाची भीती. मागील काही वर्षांत न टोचलेली सुई. तरीही ती आजी एकटीच हातात आधारकार्ड घेऊन लसीकरणाच्या रांगेत बसली होती. लस घेण्याची कक्षा जवळ येताच मात्र, ती समोर सरकलीच नाही. तिच्या मागे रांगेत असलेले समोर जात होते. ज्या डॉक्टरने तिचा लसीकरणाचा अर्ज भरून दिला, त्याच्या ते लक्षात आले. काय झाले? लस का घेत नाही? असा प्रश्न डॉक्टरने विचारला. ती काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातील भीतीचे भाव त्या डॉक्टरने ओळखले. तिचा हात पकडत, धीर देत, तिला लसीकरण कक्षात नेले. सुई टोचताना जास्त दुखणारही नाही, हा विश्वास दिला. आजीने डॉक्टरचा हात पकडून ठेवला. नर्सने एका हातात सिरिंज घेतली आणि दुसऱ्या हाताने आजीचा दंड पकडला. आजीने डॉक्टरकडे पाहिले. तिच्या हातावर दुसरा हात ठेवत हसत डॉक्टर म्हणाले, झाले... टोचून. तिला कळलेच नव्हते. नर्सने दंडावर दाबून धरलेल्या कापसाकडे ती पाहत होती. तिला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. खुर्चीवरून उठत आजीने दोन्ही हात जोडले. काहीच न बोलता आभार व्यक्त केले. त्यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू होते....अशा अनेक चांगल्या-वाईट प्रसंगातून मेडिकलचे कोव्हॅक्सिन लसीकरण केंद्र जात आहे. कोरोना काळात माणुसकीच्या भावनेने डॉक्टरांकडून दिली जात असलेली ही आपुलकीची सेवा अनेकांसाठी कौतुकाचा विषय ठरत आहे.
१६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. आणीबाणीच्या काळात रुग्णसेवा देणाऱ्या ‘हेल्थ वर्कर’ला यात प्राधान्य देण्यात आले. परंतु त्यावेळी लसीकरणाला घेऊन अनेक प्रश्न निर्माण झाल्याने व गैरसमजापोटी कमी प्रतिसाद मिळत होता. १५ फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. ‘बुस्टर डोस’ आणि ‘फ्रंटलाईन वर्कर’चे लसीकरण सुरू झाले. मात्र, १ मार्चपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होताच केंद्रावर गर्दी उसळली. अपेक्षेच्या तुलनेत लसीकरण वाढल्याने इतर केंद्रांसारखेच मेडिकलच्याही केंद्रावरील नियोजन फसले. ६० वर्षांवरील ज्येष्ठांना आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लाभार्थ्यांना सांभाळताना, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना काही वादाचे प्रसंगही घडले. परंतु दोन दिवसातच अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व पीएसएम विभागाचे प्रमुख व लसीकरण केंद्राची जबाबदारी असलेले डॉ. उदय नारलावार यांनी गर्दीचे नियोजन केले.
उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बाहेर मंडप टाकला. सुरक्षा रक्षकाला बाहेर बसवत गर्दी सुरळीत करण्यासाठी टोकन देणे सुरू केले. विशेषत: ज्येष्ठांना अडचणीचे जाऊ नये म्हणून, विभागाने दोन केंद्रांवर प्रत्येकी १०-१० डॉक्टरांची टीम तैनात केली. सहयोगी प्राध्यापक डॉ. सोनाली पाटील, सहायक प्राध्यापक डॉ. अभय चव्हाण, डॉ. रुशाली लिल्लारे, डॉ. महेश जाजुलवार, डॉ. कविनकुमार सर्वानन, डॉ. तुषार ताटे यांच्यावर लसीकरणाच्या कार्याची जबाबदारी टाकली. त्यांना डॉ. प्रेरणा देवतळे, डॉ. रविकांत, डॉ. अदिती डबीर, डॉ. पार्वती नायर, डॉ. बाला सुब्रमण्यम यांनी मदत केली.
सर्वांचेच एक पाऊल पुढे..
सर्व डॉक्टर कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळत ज्येष्ठांना लसीकरणाची माहिती देत, त्यांच्याकडून तीन पानाचे संमतीपत्र भरून घेणे, को-विन वेबसाईटवर तो डाऊनलोड करणे, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, लस घेतल्यानंतर दिसणारी लक्षणे व घ्यावयाची काळजी याची आपुलकीने माहिती देण्याचे काम सुरू केले. यामुळे काही दिवसांतच केंद्रावर येणारे ज्येष्ठ व या डॉक्टरांमध्ये एक वेगळे नाते निर्माण होत आहे. काही डॉक्टर तर याच्या एक पाऊल पुढे जाऊन, ज्येष्ठांचे मोबाईल नंबर घेत त्यांच्या प्रकृतीची विचारणाही करीत आहेत. येथील नर्सिंग स्टाफही आपली जबाबदारी ओळखून विशेषत: ज्येष्ठांना आपुलकीची सेवा देत आहे. मेट्रन वैशाली तायडे यांच्या नेतृत्वात सीमा गेडाम, कविता सुमाचे, शोभा तिवारी, छाया घाटोळे, भूमिका भावे, सुवर्णा भानारकर, सुवर्णा हाडे, शुभांगी भोराडे, स्वीटी मेश्राम, चंदा बेसेकर, नीशा अंसारी, प्रवीण पैथारे व प्रीतेश वानखेडे सेवा देत आहेत.