गर्भपात करण्याची परवानगी द्या, अन्यथा जीवन उद्ध्वस्त होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:53 IST2025-06-17T13:52:37+5:302025-06-17T13:53:16+5:30
Nagpur : बलात्कार पीडित बालिकेची हायकोर्टाला विनंती

Allow abortion, otherwise life will be ruined
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अकोला जिल्ह्यामधील बाळापूर येथील बलात्कार पीडित बालिकेने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्यासाठी गर्भपात करणे आवश्यक आहे, असे तिने याचिकेत नमूद केले आहे.
पीडित बालिका केवळ १२ वर्षे वयाची असून आठव्या वर्गात शिकत आहे. ती आई, बाबा व दोन मोठ्या बहिणींसोबत राहते. एका जवळच्या नातेवाइकाचे घर तिच्या शेजारी आहे. त्या नराधम नातेवाइकाने पीडित बालिकेवर २०२४ मध्ये वारंवार बलात्कार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. तिच्या गर्भात सध्या २८ आठवड्यांचे बाळ आहे.
आरोपीने बलात्कार केल्यानंतर ती खूप घाबरली होती. त्यामुळे तिने कोणालाही याची माहिती दिली नाही. दरम्यान, तब्येत खराब झाल्यामुळे ती गर्भवती असल्याचे समजले. मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध ५ जून २०२५ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याला अटकही झाली आहे.
वैद्यकीय मंडळाचा अहवाल मागितला
या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व सचिन देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने पीडित बालिकेची आरोग्य तपासणी करण्यासाठी तातडीने वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना दिले. तसेच, वैद्यकीय मंडळाने गर्भपातासंदर्भात मंगळवारीच अहवाल द्यावा, असे सांगितले. बालिकेच्यावतीने अॅड. सोनिया गजभिये यांनी बाजू मांडली.