चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडची ॲलर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:20 IST2021-01-13T04:20:13+5:302021-01-13T04:20:13+5:30
नागपूर : राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवेत असताना जीन्स, टी-शर्ट तसेच रंगीबेरंगी, नक्षीकाम केलेले, गडद रंगाचे ...

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडची ॲलर्जी
नागपूर : राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवेत असताना जीन्स, टी-शर्ट तसेच रंगीबेरंगी, नक्षीकाम केलेले, गडद रंगाचे कपडे घालण्यास मनाई केली आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाही शासनाने ड्रेस कोड बंधनकारक केला आहे. परंतु, शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांत काही मोजकेच चतुर्थश्रेणी कर्मचारी नियमित ड्रेस कोडमध्ये येतात. उर्वरीत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेशाची एलर्जी असल्याचे दिसून येते.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पांढरा रंगाचा शर्ट आणि पॅण्ट हा ड्रेस कोड आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना त्यासाठी ड्रेससाठी निधीसुद्धा मिळतो. पण, शहरातील अनेक शासकीय कार्यालयांत चतुर्थश्रेणी कर्मचारी ड्रेस कोडचे पालन करीत नसल्याचे दिसते आहे. ‘लोकमत’च्या पथकाने शहरातील शासकीय कार्यालयांचा आढावा घेतला असता, ज्येष्ठ चतुर्थश्रेणी कर्मचारीच फक्त गणवेशात आढळले. हे कर्मचारी नियमितच गणवेशात येतात, हे कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड सक्तीचा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याबाबत सूचनाही दिल्या जातात. पण, कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या सूचनांचे पालन होत नाही.
‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात प्रत्येक शासकीय कार्यालयांत एक ते दोन कर्मचारी सक्तीने ड्रेस कोडचे पालन करीत असल्याचे दिसून आले.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी गणवेशात यावे
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी गणवेशात यावे, यासंदर्भात शासन आदेश आहे. अधिकारी म्हणून आम्हीही त्यांना वेळोवेळी सूचना देत असतोच. पण, नियमित त्याचे पालन होत नाही. तुमच्या माध्यमातून त्यावर प्रकाश टाकण्यात आल्यास काहीतरी परिणाम नक्कीच होऊ शकतो, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
गणवेश घालण्यात कसली लाज?
शासनाने जे नियम घालून दिले आहे, त्याचे पालन प्रत्येक कर्मचाऱ्याने करणे गरजेचे आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडचा नियम आहेच. ज्या पदावर आपण कार्यरत आहोत, त्या पदाचा मान ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा काम करण्यात लाज नाही, तेव्हा गणवेश परिधान करण्यात कसली लाज? बहुतांश लोक लाजेपोटीच ड्रेस कोडचे पालन करीत नाहीत. पण, मी माझ्या सेवेत नियमित गणवेश घालून आलो, असे एका ज्येष्ठ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने सांगितले.