रेल्वे स्थानकावर कथित दहशतवादी आरडीएसक्ससह जेरबंद; पोलिसांची मॉकड्रील
By नरेश डोंगरे | Updated: January 16, 2024 19:59 IST2024-01-16T19:59:42+5:302024-01-16T19:59:51+5:30
आकस्मिक स्थितीचा सामना करण्यासाठी केली चाचपणी

रेल्वे स्थानकावर कथित दहशतवादी आरडीएसक्ससह जेरबंद; पोलिसांची मॉकड्रील
नागपूर : मोठ्या प्रमाणात आरडीएक्स घेऊन घातपात घडविण्यासाठी निघालेल्या तीन कथित दहशतवाद्यांना मंगळवारी सायंकाळी नागपूर रेल्वे स्थानक परिसरात जेरबंद करण्यात आले. आणिबाणीची स्थिती निर्माण झाल्यास रेल्वे पोलिसांची आणि रेल्वे सुरक्षा दलाची काय तयारी आहे, ते तपासण्यासाठी मंगळवारी नागपूर रेल्वे स्थानकावर रंगित तालिम (मॉक ड्रील) घेण्याचे आदेश मिळाले होते. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी ही नाट्यमय घडामोड घडवून आणण्यात आली.
२२ जानेवारीला अयोध्येत मोठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर चार दिवसांनी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आहे. अशात समाजकंटकाकडून रेल्वे स्थानक अथवा रेल्वे गाडीत कोणती घातपाताची घटना घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास रेल्वे पोलीस आणि सुरक्षा दल किती तत्पर आहे, ते बघण्यासाठी या मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार, तीन संशयीत दहशतवादी मोठ्या प्रमाणात स्फोटके (आरडीएक्स) घेऊन रेल्वे स्थानक परिसरात शिरल्याचा कॉल देण्यात आला. तो ऐकताच रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), आरोग्य विभाग,अग्निशमन दल असे एकूण १५ अधिकारी आणि ६२ कर्मचारी आणि प्रिन्स, मार्शल आणि टायगर या श्वानाच्या मदतीने रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर धडकले. जवळच्या गार्ड लॉबीत कथित दहशतवादी वावरत असल्याचे कळाल्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सुरक्षा दलाने धावपळ सुरू केली. सायंकाळी ४.१५ वाजता सुरू झालेल्या या रंगित तालिमेत फलाटा जवळच्या गार्ड लॉबीत कथित दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आरडीएक्सही जप्त करण्यात आले.
अन् प्रवाशांचा जीव भांड्यात पडला
सुमारे दीड तास ही नाट्यमय घडामोड सुरू होती. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांमध्ये प्रारंभी घबराट निर्माण झाली होती. त्यांना आकस्मिक संकटाला सामोरे जाण्यासाठीची तयारी तपासण्यासाठी ही रंगित तालिम असल्याचे कळाल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.