भाजपच्या निलंबित माजी आमदाराचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे माझ्यावर कारवाई
By योगेश पांडे | Updated: October 18, 2024 17:52 IST2024-10-18T15:02:51+5:302024-10-18T17:52:10+5:30
गडकरींच्या कार्यकर्त्यांवर जाणुनबुजून कारवाई : राष्ट्रीय अध्यक्षांना पाठविले पत्र

Allegation of suspended ex-MLA of BJP, action against me due to pressure from Chief Minister
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांना पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. रेड्डी यांनी या मुद्द्यावरून भाजपच्या नेत्यांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावामुळे कारवाई झाल्याचा आरोप केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यकर्त्यांवर जाणुनबुजून कारवाई होत असल्याचादेखील त्यांनी दावा केला. नागपुरात ते शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
रामटकेची जागा शिंदेसेनेचे आ.आशीष जयस्वाल यांना जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. याविरोधात रेड्डी यांनी आवाज उचलला होता. त्यामुळे दोन दिवसांअगोदर त्यांना भाजपने निलंबित केले. यानंतर रामटेकमधील पाचशेहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचा राजिनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर रेड्डी यांनी शुक्रवारी भूमिका मांडली. मी नितिन गडकरी यांच्या नेतृत्वात अनेक वर्षापासून पक्षाचे काम करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आशीष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली, मात्र आम्हाला कुणीही कळविले नाही. २०१४ मध्ये मी जयस्वाल यांना हरवून निवडून आलो होतो. तर याच जयस्वाल यांनी बंडखोरी करत भाजपविरोधात निवडणूक लढविली होती. मी तरीदेखील भाजपचे प्रामाणिकपणे काम केले. मी तिकीटाची मागणीदेखील केली नाही. भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला उमेदवारी द्यावी ही आमची मागणी होती. मात्र माझ्यावर कोणतेही कारण नसताना निलंबनाची कारवाई झाली. कारणे दाखवा नोटीसदेखील न देता माझ्यावर ताबडतोब करवाई करण्यात आली. नेत्यांच्या मनात येईल तशी कारवाई होत असेल तर कोणताही कार्यकर्ता आपले मत मांडणारच नाही. माझ्यावर झालेला अन्याय म्हणजे नागपूर जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यावरील अन्याय आहे.
गडकरींच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर कारवाई केली जात आहे. आज माझ्यावर झाली उद्या दुसऱ्याविरोधात कारवाई होईल. मी याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना पत्र पाठविले आहे, असे रेड्डी म्हणाले. मी भाजप पक्ष सोडला नसून पक्षासाठी काम करत राहील, असेदेखील त्यांनी सांगितले.