अक्षय कुमार, प्राजक्ता गोडबोले ‘नागपूर महामॅरेथॉन’चे विजेते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 05:34 AM2024-02-05T05:34:18+5:302024-02-05T05:34:42+5:30

२१ किलोमीटर खुल्या गटात मारली बाजी : ७ व्या पर्वाला नागपूरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

Akshay Kumar, Prajakta Godbole winner of 'Nagpur Mahamarathon' | अक्षय कुमार, प्राजक्ता गोडबोले ‘नागपूर महामॅरेथॉन’चे विजेते

अक्षय कुमार, प्राजक्ता गोडबोले ‘नागपूर महामॅरेथॉन’चे विजेते

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पहाटेच्या प्रसन्न हवेत कस्तुरचंद पार्कच्या दिशेने झेपावणारी पावले, चेहऱ्यावर सळसळता उत्साह, मनात अभूतपूर्व आत्मविश्वास, लक्ष ध्येयाकडे आणि जिद्द धावण्याची! पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, पोलिस बँड, शाळकरी मुलींचे नृत्य, सोबतीला विविध रंगांची उधळण असताना बेभान झालेले नागपूरकर रविवारी सुसाट धावले. अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात रंगलेला ‘नागपूर महामॅरेथाॅन’चा थरार २१ किलोमीटर खुल्या गटात पुरुषांमध्ये   नाशिकचा अक्षय कुमार याने, तर महिलांमध्ये नागपूरची प्राजक्ता गोडबोले हिने जिंकला.  आरसी प्लास्टो टॅंक ॲन्ड पाइप प्रेझेंट ७ व्या नागपूर महामॅरेथॉनचे गेल (इंडिया) लिमिटेड आणि निर्मय इन्फ्राटेक हे सहप्रायोजक होते.

सकाळी सहा वाजता २१ किलोमीटरच्या खुल्या गटातील धावपटूंना मान्यवरांनी फ्लॅग ऑफ केला आणि स्पर्धकांचा ओसंडून वाहणारा लोंढा धावू लागला. ठराविक वेळेनंतर एकापाठोपाठ एक १० किमी, ५ किमी आणि ३ किमी शर्यती सोडण्यात आल्या. अत्यंत नेटके नियोजन पाहून स्पर्धकांना चीअरअप करण्यासाठी आलेले क्रीडाप्रेमी, चाहते आणि नातेवाईक भारावून गेले. वॉर्मअपचा, धावण्याचा आणि नृत्यांचा मनमुराद आनंद असा त्रिवेणी संगम उपस्थितांनी अनुभवला.

अक्षयने एक तास, पाच मिनिटे, दोन सेकंद वेळ नोंदविली. प्राजक्ताने सलग चौथ्यांदा शर्यत जिंकताना एक तास, १८ मिनिटे, २१ सेकंद अशी वेळ नोंदविली.  स्थानिक मध्य रेल्वेचा धावपटू नागराज खुरसनेने  १ तास, ६ मिनिटे, २ सेकंदांसह पुरुष गटात दुसऱ्या, तर  पंचानन बेरा एक तास, ८ मिनिटे, २ सेकंदांसह तिसऱ्या स्थानी राहिला. महिलांमध्ये स्थानिक धावपटू  तेजस्विनी लांबकाणे एक तास, २२ मिनिटे, १६ सेकंदांसह दुसऱ्या, तसेच अर्पिता सैनी एक तास, २६ मिनिटे, १२ सेकंद वेळेसह तिसऱ्या स्थानावर राहिली.  १० कि. मी. खुल्या पुरुष गटात नागपूरचा शादाब पठाण याने बरोबर ३० मिनिटांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकाविला.  १० कि. मी. खुला गट महिलांमध्ये हरयाणाची किरण दाबोडिया हिने ३५ मिनिटे, ३३ सेकंद वेळेसह विजेती होण्याचा मान मिळविला.

महामॅरेथॉन निकाल
२१ किलोमीटर पुरुष (खुला गट) : अक्षय कुमार ०१:०५:०२, नागराज खुरसने ०१:०६:०२, पंचानन बेरा ०१:०८:०२. २१ किलोमीटर निओ व्हेटरन पुरुष : रमेश गवळी ०१:०९:१२, दीपक कुंभार ०१:११:१९, रत्ती सैनी ०१:१२:१०. २१ किलोमीटर व्हेटरन पुरुष : भास्कर कांबळे ०१:१६:४०, आरबीएस मोनी ०१:२४:२९, अब्दुल फारुख ०१:२७:११. २१ किलोमीटर महिला (खुला गट) : प्राजक्ता गोडबोले ०१:१८:२१, तेजस्विनी लांबकाणे ०१:२२:१६, अर्पिता सनाई ०१:२६:१२. २१ किलोमीटर निओ व्हेटरन महिला : ज्योती गवते ०१:२८:३६, प्रतिमा टुडू ०१:३५:५७, राहिला बीबी ०१:४०:३५. २१ किलोमीटर व्हेटरन महिला : डॉ. टंडन ०१:४४:२१, सरोज जैस्वाल ०२:१९:१२, श्वेता टेकरीवाल ०२:३७:२६. १० किलोमीटर पुरुष (खुला गट) : शादाब पठाण ००:३०:००, राकेश राकेश ००:३०:३८, सौरव तिवारी ००:३०:५२. १० किलोमीटर निओ व्हेटरन पुरुष : अक्षय कुमार ००:३३:३२, परम सिंग ००:३४:११, चंद्रवीर सिंग ००:३४:३९. १० किलोमीटर व्हेटरन पुरुष : राजकुमार ००:३८:३२, समीर कोलया ००:३८:३४, सुभाष चिमणकर ००:३८:५१. १० किलोमीटर महिला (खुला गट) : किरण दाबोडिया ००:३५:३३, रिया दोहतरे ००:३६:००, मंजू यादव ००:३६:५५. १० किलोमीटर निओ व्हेटरन महिला : अपर्णा हलदर ००:४५:४१, शारदा काळे ००:४६:५२, गुंजन बाटविया ००:५३:३२. १० किलोमीटर व्हेटरन महिला : प्रतिभा नाडकर ००:५२:३७, रेणू सिद्धू ००:५५:३६, शारदा भोयर ००:५८:०२ 

सलग चौथ्यांदा मी लोकमत नागपूर महामॅरेथॉनचे विजेतपद पटकावले आहे. स्वगृही होणाऱ्या या स्पर्धेत धावण्यासाठी मी विशेष उत्साही असते. छत्रपती संभाजीनगर येथील लोकमत महामॅरेथॉनही मी जिंकली होती; पण नागपूरमध्ये अधिक वेगाने धावले. स्पर्धा अटीतटीची होती. त्यामुळे कस लागला. पण, विजेतेपद कायम राखता आल्याचा आनंद आहे. यापुढील स्पर्धांमध्ये लय कायम राखत विजयी होण्याचा माझा प्रयत्न असेल.
- प्राजक्ता गोडबोले, (२१ किमी. महिला विजेती)

लोकमत महामॅरेथॉन धावण्याचा माझा हा दुसरा अनुभव. यापूर्वी नाशिकच्या स्पर्धेत मी धावलो होतो. त्यावेळी पहिला क्रमांक थोडक्यात हुकला; पण नागपुरात याची कसर भरून काढायची, हा निश्चय केला होता. मातब्बर स्पर्धक असल्याने ही स्पर्धा जिंकणे सोपे नव्हतेे; पण अखेरच्या क्षणापर्यंत स्टॅमिना टिकवून ठेवल्यामुळे मला पहिला क्रमांक पटकावता आला. या महिन्यात होणाऱ्या लोकमत पुणे महामॅरेथॉनमध्येही मी सहभागी होणार आहे.     
    - अक्षय कुमार, (२१ किमी. पुरुष विजेता)

१८ फेब्रुवारीला पुण्यात धावा
नागपुरात रविवारी अतिशय उत्साहात पार पडलेल्या लोकमत नागपूर महामॅरेथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. राज्यभरात लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित करणारी पुढील महामॅरेथाॅन १८ फेब्रुवारीला  पुणे येथे होणार आहे. 

Web Title: Akshay Kumar, Prajakta Godbole winner of 'Nagpur Mahamarathon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.