Ajit Pawar's Watch on Nagpur NMC | नागपूर मनपावर अजित पवार यांचा ‘वॉच’

नागपूर मनपावर अजित पवार यांचा ‘वॉच’

ठळक मुद्देगैरव्यवहार व कॅमेरे चोरीवरून विधानसभेत लावले प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगर पालिकेतील गैरव्यवहार आणि कॅमेरे चोरीच्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने पवार यांचा मुख्यमंत्र्यांच्या महापालिकेवर विशेष वॉच असल्याचे दिसून येत आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या कारखाना (स्थापत्य) विभागातील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या पडताळणीसाठी खरेदी करण्यात आलेले कॅमेरे चोरीला गेल्या प्रकरणी अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या दोन्ही प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: लेखी उत्तर दिले. पहिल्या प्रश्नांत त्यांनी मनपा कारखाना विभागातील अधिकाऱ्यांनी गाड्यांचे टायर, बॅटरीसह सुटे भाग बाजारभावापेक्षा पाचपट अधिक दराने खरेदी करून कोट्यवधी रुपयाचा अपहार केल्याचा मुद्दा उपस्थित केला.
यावर नागपूर महानगरपालिकेच्या कारखाना (स्थापत्य) विभागातील गैरव्यवहार प्रकरणी पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येत असून चौकशी अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिका स्तरावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात दिली.
यानंतर मनपाच्या प्राथमिक शाळांसाठी सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या ३० पैकी १० कॅमेरे गायब झाले असून कॅमेऱ्याची नस्ती देखील गहाळ झल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: लेखी उत्तर दिले. या प्रकरणातील संबंधित कनिष्ठ लिपीक सेवानिवृत्त झाला असून त्याच्याकडून १० कॅमेऱ्याची किंमत १ लाख ९ हजार ९०० रुपये वसुल करण्यात आली आहे. तसेच पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल असल्याची माहिती लेखी उत्तरत दिली.

Web Title: Ajit Pawar's Watch on Nagpur NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.