लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्यात आकाशाला भिडलेले घरगुती विमान तिकिटांचे दर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. दोन महिन्यांआधी २० हजारांपर्यंत विकले गेलेले नागपूरमुंबईचे तिकीट ४,१०० रुपयांपर्यंत आणि दिल्लीचे दर ५,५०० ते ६ हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. प्रवासी संख्येअभावी नागपूर ते गोवा, पुणे, इंदूर, हैदराबाद या मार्गावरील तिकिटांच्या दरातही घसरण झाली आहे. ही बाब नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी सुखदायक आहे.
दरवर्षी उन्हाळ्यानंतर पावसाळा आणि शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घसरण होते. त्याचाच परिणाम म्हणून विमान कंपन्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तिकिटांचे दर कमी करतात. मुख्यत्वे नागपूर ते मुंबई आणि दिल्लीचे विमानाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. ऑनलाइन वेबसाइटवर नागपूर ते मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, इंदुर, हैदराबाद, अहमदाबाद या मार्गावर तिकिटांचे दर कमी झाल्याचे दिसून येत आहे. पुढे सणासुदीच्या काळात आणि दसरा-दिवाळीत प्रवासी संख्या वाढताच दर वाढतील. सध्या कंपन्यांच्या सवलतीच्या दराचा प्रवाशांना फायदा घेता येईल, असे सूत्रांनी सांगितले.
नागपुरातून दररोज ३० विमानांचे उड्डाणनागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज ३० विमानांचे उड्डाण होते आणि तेवढीच उतरतात. मुंबई आणि दिल्लीकरिता ६-६ उड्डाणे आहेत. पुण्याकरिता ३ असून, त्यापैकी दोन दररोज आणि एक शनिवार वगळता इतर दिवशी उड्डाण भरते. बंगळुरूकरिता दररोज चार उड्डाणे, हैदराबाद दोन, कोलकाता एक, इंदुर दोन, अहमदाबाद दोन, कोल्हापूर एक, किशनगढ एक आणि गोवाकरिता एक उड्डाण आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेत शारजाह आणि दोहाकरिता एक-एक उड्डाण आहे. तर सिझनआधी बंद करण्यात आलेली लखनौ, नाशिक, औरंगाबाद, बेळगाव विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाही.