रोमिओच्या पाठलाग व धमक्यांमुळे एअरलाइन्सच्या केबिन क्रू तरुणीचे करिअर संपलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:50 IST2025-07-09T18:46:07+5:302025-07-09T18:50:31+5:30
फेसबुक ओळख ठरली जीवघेणी : प्रेमात नकार दिला म्हणून सुरु झाला छळ

Airline cabin crew girl's career ended due to Romeo's stalking and threats
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विवाहित असूनदेखील एका रोमिओने एकतर्फी प्रेमातून एअर लाइन्समध्ये काम करणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून सातत्याने धमक्या दिल्या. त्याच्या दहशतीमुळे अखेर तरुणीने नोकरीवर पाणी सोडले. पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
वीरसिंग अमरसिंग वर्मा (धम्मदीपनगर) असे आरोपीचे नाव आहे. संबंधित तरुणी मागील काही वर्षापासून देशातील नामांकित एअरलाइन्समध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होती. घराजवळील एका तरुणाचा नातेवाईक असलेल्या वीरसिंगसोबत तरुणीची २०१९ साली ओळख झाली होती. वीरसिंगने तिला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती व संबंधित तरुणाच्या सांगण्यावरून तिने ती स्वीकारली. त्यानंतर त्यांचे बोलणे सुरू झाले. २०२१ साली वीरसिंगचे लग्न झाले. मात्र, लग्न झाले असूनदेखील तो सातत्याने तरुणीवर बोलण्याचा दबाव आणायचा व तिला भेटण्यासाठी जबरदस्ती करत होता. जर बोलली नाहीस तर तिच्या होणाऱ्या पती तसेच घरच्यांना प्रेमप्रकरण असल्याचे खोटे सांगण्याची तो धमकी देत होता. ऑगस्ट २०२४ मध्ये त्याने तिच्यावर प्रेमसंबंध बनविण्याचा दबाव आणला. सप्टेंबर २०२४ मध्ये तरुणी कामानिमित्त तेलंगणामध्ये राहायला गेली. तेथेदेखील आरोपी वीरसिंग तिच्या पाठोपाठ पोहोचला. तिथेदेखील तो तिला धमकी देऊन भेटण्यासाठी जबरदस्ती करत होता.
या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने महिन्याभरापूर्वी नागपूर गाठले व तणावातून दोन आठवड्यांअगोदर नोकरीचा राजीनामा दिला. सहनशक्ती संपल्याने तिने तिच्या कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी त्याच्याशी बोलण्यासाठी त्याचे घर गाठले, मात्र तो घरी नव्हता. काही वेळाने त्याने तरुणीला फोन करून तिच्यासह तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. अखेर तरुणीने कळमना पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी वीरसिंगविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मी बजरंग दलाचा कार्यकर्ता, तुझ्यासोबत काहीही करू शकतो
तरुणीला शिवीगाळ करत असताना वीरसिंगने तुम्ही माझे काहीच बिघडवू शकत नाही. माझी ओळख वरपर्यंत आहे. मी बजरंग दलाचा कार्यकर्ता असून तुझ्यासोबत काहीही करू शकतो. पोलिस पण माझे काही बिघडवू शकत नाही, असे म्हणत तिला व कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. एका रोमिओच्या त्रासाला कंटाळून हरहुन्नरी तरुणीला तिच्या करिअरवर पाणी सोडावे लागणे ही संतापजनक बाब आहे.