आता सकाळीच उपलब्ध राहणार एअर इंडियाची विमाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 22:52 IST2021-06-14T22:51:29+5:302021-06-14T22:52:10+5:30
Air India flights एअर इंडियाने जारी केलेल्या निर्देशांनुसार आता मुंबईच्या उड्डाणांसाठी ५० टक्के शेड्युल संचालित करावे लागणार आहे. या कारणामुळे एअर इंडिया मुंबई-नागपूर-मुंबईचे विमान बंद करून केवळ सकाळच्या वेळीच आठवड्यातून पाच दिवस ही विमाने संचालित करण्यात येणार आहेत.

आता सकाळीच उपलब्ध राहणार एअर इंडियाची विमाने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एअर इंडियाने जारी केलेल्या निर्देशांनुसार आता मुंबईच्या उड्डाणांसाठी ५० टक्के शेड्युल संचालित करावे लागणार आहे. या कारणामुळे एअर इंडिया मुंबई-नागपूर-मुंबईचे विमान बंद करून केवळ सकाळच्या वेळीच आठवड्यातून पाच दिवस ही विमाने संचालित करण्यात येणार आहेत.
१६ जून ते ३१ जुलैपर्यंत लागू होत असलेल्या या शेड्युलनुसार एअर इंडियाचे एआय ६२७ हे विमान मुंबईवरून पहाटे ५.३५ वाजता रवाना होऊन नागपूरला सकाळी ७.२० वाजता पोहोचेल. तर एआय ६२८ हे विमान सकाळी ७.५५ वाजता नागपूरवरून उड्डाण घेऊन सकाळी ९.२० वाजता मुंबईला पोहोचेल. हे विमान सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी उपलब्ध राहणार आहे. याशिवाय एअर इंडियाचे नागपूरवरून दिल्लीला जाणारे विमान आधीच सकाळच्या वेळी संचालित करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या एअर इंडियातर्फे ३१ जुलैपर्यंत सायंकाळी कोणतेच विमान संचालित करण्यात येणार नाही.
वाढत आहेत विमाने
दुसऱ्या लॉकडाऊननंतर मागील आठवड्यापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केवळ ५ ते ६ विमाने संचालित करण्यात येत होती. परंतु आता इंडिगोचे बंगळुरू आणि हैदराबाद विमान सुरू झाल्यानंतर आणि गो एअरचे विमान रद्द होणे कमी झाल्यानंतर डझनभर विमानांचे संचालन होत आहे. कोरोनाची लाट ओसरत असली तरी आताही विमानतळावर प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासी प्रवास करीत आहेत.