कृषी अवजारे घोटाळ्याची पुन्हा सखोल चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:11 IST2025-03-25T17:10:49+5:302025-03-25T17:11:21+5:30
Nagpur : जिल्हाधिकाऱ्यांनी केली समिती गठित

Agricultural implements scam to be thoroughly investigated again
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजकल्याण विभागामार्फत महिला बचत गटांना पुरविण्यात आलेल्या कृषी अवजारांमध्ये घोटाळा झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले होते. आता या प्रकरणाची नव्याने सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दोन समिती गठित केली आहे. पीएमओ कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेत यासंदर्भातील अहवाल मागितल्याने चौकशी समिती गठित करण्यात आली.
समाजकल्याण विभागामार्फत २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील १०० महिला बचत गटांना कृषी अवजारे देण्याची योजना आखली. यासाठी खनिज प्रतिष्ठानमधून ८ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर झाला होता. प्रत्येक महिला बचत गटाला ८ लाख ७१ हजारांचे साहित्य देण्यात येणार होते. परंतु उमरेड तालुक्यातील महिला बचत गटांना साहित्य मिळालेच नाही. पुरवठादाराने साहित्यच दिले नाही. हे साहित्य ९० टक्के अनुदानावर देण्यात आले. १० टक्के रक्कम भरल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात टाकण्यात आली. समाज कल्याण विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात आल्यानंतर ती लगेच काढण्यात आल्याची माहिती समोर आली. पुरवठादाराकडून काही साहित्य बचत गटांना देण्यात आले. परंतु ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करीत परत नेले. १० टक्के रक्कम त्रयस्थ व्यक्तीकडून भरण्यात आल्याची बाबही तपासात समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार खनिकर्म विभागाकडून संबंधित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. परंतु कुठलीच कारवाई झाली नव्हती. या प्रकरणातील दोषींना पाठिशी विभाग घालत असल्याची चर्चा रंगली होती. आता या प्रकरणी नव्याने सखोल चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती गठित करण्यात आल्याचे समजते.
पीएमओकडून दखल, विधिमंडळात प्रश्न
या विषयासंदर्भात खासदार श्यामकुमार बर्वे यांनी तक्रार केल्याने थेट पीएमओ कार्यालयाकडून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. त्याच प्रमाणे आमदार विकास ठाकरे यांनीही विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला होता.