अत्याधुनिक तंत्रज्ञानानेच शेतीचा विकास
By Admin | Updated: December 12, 2015 05:56 IST2015-12-12T05:56:09+5:302015-12-12T05:56:09+5:30
हवामानाच्या लहरीपणामुळे आता शेतीवर अवलंबून राहता येणार नाही. पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची

अत्याधुनिक तंत्रज्ञानानेच शेतीचा विकास
वसुंधरा राजे यांचे प्रतिपादन : ‘अॅग्रो व्हिजन’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर : हवामानाच्या लहरीपणामुळे आता शेतीवर अवलंबून राहता येणार नाही. पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. मुबलक पाणी, वीज, सिंचन व्यवस्था आणि उत्पादकता वाढविणाऱ्या तंत्रज्ञानानेच शेतीचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी येथे केले.विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या ‘अॅग्रो व्हिजन’ हे चार दिवसीय राष्ट्रीय कृषी प्रदर्शन रेशीमबाग मैदानावर शुक्रवार, ११ डिसेंबरपासून सुरू झाले. उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी होते.
या समारंभात केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राजस्थानचे कृषिमंत्री प्रभुलाल सैनी, महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, खासदार रामदास तडस, बिहारचे लोक समता पक्षाचे खासदार डॉ. अरूण कुमार, आमदार अनिल सोले, नाना शामकुळे, मिलिंद माने, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, जोगेंद्र कवाडे, आशिष देशमुख, डी. मल्लिकार्जुन रेड्डी, माजीमंत्री रणजित देशमुख, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, माफसुचे कुलगुरू आदित्यकुमार मिश्रा, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू रविप्रकाश दाणी, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, अॅग्रो व्हिजनचे संयोजक सचिव रवी बोरटकर व रमेश मानकर, अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष व कृषी शास्त्रज्ञ नेमणूक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, विद्याताई मुरकुंटे, अण्णासाहेब पाटील उपस्थित होते.
राजस्थानातही ‘जलयुक्त शिवार’ अभियान
वसुंधरा राजे म्हणाल्या, महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानातही ‘जलयुक्त शिवार’ हे अभियान २६ जानेवारीपासून सहा महिन्यांसाठी राबविण्यात येणार आहे. ३ हजार गावांमध्ये पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्यांची प्रगती होईल. राजस्थानातील शेतकरी संकटात आहेत. परंपरागत शेतीमध्ये आम्ही फसल्याने हे संकट ओढावले आहे. शेतकी उत्पादनांना चांगले मूल्य मिळावे म्हणून शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञान मिळाले पाहिजे. राजस्थानात डाळी आणि तेलबियांचे उत्पादन वाढले आहे. देशात कृषीचे राष्ट्रीय सकल उत्पादन ३.९ टक्के असताना राजस्थानात ५.७ टक्क्यांवर गेले आहे. जैविक शेती, फूड व बायो तंत्रज्ञान, कोल्ड स्टोरेजशी शेतकऱ्यांना जोडले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
राजस्थानातून संत्री व स्ट्राबेरीची झाडे न्या!
इस्रायलमधील प्रगत शेतीसंदर्भात वसुंधरा राजे म्हणाल्या, इस्रायल हा छोटाशा देश आहे. तिथे पाणी नाही, पण शेतकरी प्रगत आहेत. आम्ही तेथून जैतूनची झाडे आणली. त्याची १५०० एकर शेतीमध्ये शेती केली. त्यापासून ‘राज ब्रॅण्ड’ नावाने तेलाची निर्मिती केली. जेवणात आणि अंगाला लावण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो. राजस्थानात संत्री आणि स्ट्राबेरीची शेती मोठ्या प्रमाणात होते. कदाचित तुम्हाला आमच्याकडील झाडे न्यावी लागतील, असा टोला त्यांनी गडकरी यांना लगावला. जागतिक दर्जाच्या खजूराची शेती करण्यात येत आहे. जैविक शेतकी उत्पादने दुप्पट, तिप्पट दरात विकली जातात. रसायनिक खते दूर सारून जैविक खतांचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शेतकरी आत्महत्या करीत नाहीत
शेती बुडाल्यास राजस्थानातील शेतकरी आत्महत्या करीत नाहीत. राजस्थानमध्ये कृषी क्षेत्राबरोबरच पूरक अशा पशुधनाची साथ शेतकऱ्यांना मिळत असल्याने, शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. राजस्थानचे शेतकरी मजबूत आहेत. थंडी आणि गर्मीतही सक्षमतेने उभे राहतात. राजस्थानसारख्या प्रदेशात पाण्याचे प्रमाण कमी असूनही तेलबिया, नगदी पिके, फळे, पालेभाज्यांच्या उत्पादनात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल करावा : नितीन गडकरी
परंपरागत पिकांचे उत्पादन घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी डाळ व तेलबियासारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी पीक पद्धतीमध्ये बदल करावा, यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
बॉयोप्लास्टिकची निर्मिती करावी
गडकरी म्हणाले, शेतकऱ्याला ठिंबक सिंचन, २४ तास पाणी आणि वीज मिळाल्यास शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणता येतील, असे सांगून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून शेतीचा विकास घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांची गडकरींनी प्रशंसा केली. शेतीतील तण आणि कचऱ्यापासून इथेनॉल, बॉयोप्लास्टिकची निर्मिती केल्यास शेतकऱ्यांना भरघोस नफा मिळेल. मृदा आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जमिनीचा कस टिकवणाऱ्या खत व बियाणाची माहिती संकलित करून सेंद्रीय शेतीची कास धरावी आणि शेतीमध्ये अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जास्त पैसे मिळेल ते पीक घ्यावे
ज्यांच्यात पैसे मिळतील, ते पीक शेतकऱ्यांनी घ्यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रशिक्षण, तंत्रज्ञान याची माहिती मिळावी, यासाठी ‘अॅग्रो व्हिजन’च्या माध्यमातून ४० कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘भारतीय कृषी क्षेत्रात रेडिएशनची उपयुक्तता’ या विषयावर भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांचे भाषण होणार असून नाशवंत पिकांचे शेल्फ लाईफ वाढविण्यासाठी अणुऊर्जेच्या उपयुक्ततेसंबंधी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. संत्र्यांवर प्रक्रिया करणारे कारखाने विदर्भात उभे राहावे. उसामध्ये आॅलिव्ह पिकाचा प्रयोग करावा. शेतकऱ्यांना नफा होईल, असे त्यांनी सांगितले.
अंबानी विदर्भातील जैविक सीताफळांच्या प्रेमात
अॅग्रो व्हिजन प्रदर्शनाचा उद्देश सांगताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी पीक पद्धतीत बदल करून पारंपरिक पिकांपेक्षा मागणी असणारे उत्पादन काढण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. राजस्थानमध्ये जैविक शेतीवर भर देत असल्याची माहिती राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी स्पष्ट केली. या पार्श्वभूमीवर जैविक शेती हाच योग्य पर्याय असून रासायनिक खतांपेक्षा नैसर्गिक खतांचा विकास करणे आवश्यक असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले. यावेळी उदाहरण देताना त्यांनी अंबानी यांना विदर्भातील जैविक खतापासून तयार झालेली सीताफळे आपण सहज भेट दिली होती. त्या सीताफळांना खूप चांगली चव होती आणि त्याचा दर्जाही उच्च प्रतीचा होता. ही सीताफळे अंबानी कुटुंबीयांना खूप आवडली. ती सीताफळे पुन्हा मिळावी म्हणून अंबानींनी मला जवळपास १५ वेळा फोन केले आणि ज्यांच्या शेतातील सीताफळे होती त्या पाटील यांचा क्रमांक मागितला. त्यानंतर अंबानी यांनी अनेकदा ही सीताफळे विदर्भातून मागितली आणि त्यासाठी पैसाही खर्च केला, अशी आठवण गडकरी यांनी सांगितली. सेंद्रीय शेतीतून उत्पादित होणाऱ्या मालाचा दर्जा उच्च असतो त्यामुळे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आपण करीत असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.
अॅग्रो व्हिजन ही एक चळवळ : देवेंद्र फडणवीस
‘अॅग्रो व्हिजन’ ही चळवळ झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात एक परिवर्तन घडले आहे, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी वातावरण बदलाचा अंदाज घेऊन पीक पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. परंपरागत उत्पादनापेक्षा निर्यात मूल्य जास्त असणाऱ्या पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
शाश्वत शेतीसाठी जलयुक्त शिवार
शेतीवर प्रयोग करून उत्पादकता वाढविली पाहिजे. जलयुक्त शिवारामुळे ६ हजार गावांना फायदा झाला आहे. १४०० कोटींच्या गुंतवणुकीतून २४ टीएमसी पाणी अर्थात ६.५ हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. पुढील वर्षी ५ हजार गावांना फायदा होईल, असे अभियान राबविण्यात येणार आहे. शाश्वत शेतीसाठी जलयुक्त शिवार उपयुक्त आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात २ लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणार आहे. त्यापैकी ८० हजार शेतकऱ्यांना कनेक्शन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी जोडधंदा करावा
या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत प्रगत तंत्रज्ञान दरवर्षी पोहोचले पाहिजे. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात बदल झाला आहे. विविध प्रशिक्षण आणि वेगळेपण अधोरेखित झाले आहे. दरवर्षी ५ लाखांपेक्षा जास्त शेतकरी प्रदर्शनाला भेट देतात. मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षीच्या २० हजाराच्या तुलनेत यावर्षी २४ हजार गावांना दुष्काळाची झळ पोहोचली आहे. पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भाचा काही भाग आणि मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करावा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.विदर्भाच्या कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये टेक्सटाईल पार्कच्या उभारणीमधून कापूस प्रकिया उद्योग सुरू झाले आहेत. अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे. कृषीकर्जाच्या पलीकडे जाऊन शेतीच्या क्षेत्रातील संरचना आणि जल व्यवस्थापनात केंद्र सरकारने गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.अॅग्रो व्हिजनमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेले शेतकरी, व बांधव तसेच या कृषी प्रदर्शनात महाराष्ट्राशिवाय छत्तीसगड, मध्य प्रदेश, हरियाणा, आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे शेतकरीही नवी माहिती घेण्यासाठी सहभागी झाले आहेत. संचालन रेणुका देशकर यांनी केले. ‘अॅग्रो व्हिजन’चे संयोजक सचिव रमेश मानकर यांनी आभार मानले.या समारंभात अॅग्रो व्हिजनचे पदाधिकारी उपस्थित होते.
वसुंधरा राजे यांचे मराठी प्रेम
वसुंधरा राजे यांनी भाषणाच्या प्रारंभी मराठीतून संवाद साधला. मराठी चांगले बोलता येत नाही, पण देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याशी मराठीतून संवाद साधत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी नितीन गडकरी यांची प्रशंसा केली. ते ज्या राज्यात जातात ते राज्य त्यांचे प्रिय होते. त्यांचा सल्ला मोलाचा ठरतो. गडकरी यांनी विमानतळापासून आतापर्यंत नागपूर विकास, रस्ते, पाणी, शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, इथेनॉलची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
‘कृषी कल्याण’ विशेषांकाचे प्रकाशन
अॅग्रो व्हिजन प्रदर्शनाची संपूर्ण माहिती देणाऱ्या ‘कृषी कल्याण’ (साप्ताहिक) या विशेषांकाचे प्रकाशन वसुंधरा राजे यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
‘राज ब्रॅण्ड’ आॅलिव्ह तेलाचे लोकार्पण
राजस्थानमध्ये आॅलिव्हपासून निर्मित ‘राज ब्रॅण्ड’ तेलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. इस्रायलमधून आणलेली आॅलिव्हची (जैतून) झाडे १५०० एकरमध्ये लावली आहे. त्यापासून तेलाची निर्मिती केली असून हे तेल खाण्यायोग्य आणि शरीरासाठी उपयुक्त आहे.
शेतकऱ्यांना मिळणार तंत्रज्ञानाची माहिती
कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने अॅग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आज थाटात करण्यात आले. या प्रदर्शनात कृषी क्षेत्राशी संबंधित माहितीचे भांडार आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहे. यासाठी रेशीमबागच्या प्रांगणात सात भव्य डोम उभारण्यात आले आहेत. पारंपरिक शेतीला पर्याय निवडता यावा तसेच अधिक उत्पादन घेता यावे म्हणून प्रदर्शनात विज्ञान, तंत्रज्ञान, बियाणे आदींसह शेतीची आणि उत्पादनांची विविधांगी माहिती असलेली पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शेतकरी साधारणत: पारंपरिक पिकांवरच अवलंबून असतात. वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलात पिकांची पद्धत आणि पीकबदल करणेही परिस्थितीसापेक्ष आवश्यक आहे. यासाठी मातीचा गुण पाहून त्याप्रमाणे पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात कुठले पीक अधिक उत्पादन मिळवून देऊ शकते, याची माहिती नसते. प्रदर्शनात माती तपासणी कार्यशाळा चार दिवस उपलब्ध असणार आहे. शेतकऱ्यांनी शेतातील माती आणून येथे तपासणी केल्यास संबंधित मातीत कुठले पीक घेणे शेतकऱ्यांना लाभदायी ठरेल, याचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करणार आहेत. आज पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांनी भेट देऊन विविध स्टॉल्सवर बीज, कीटकनाशके, पिकांच्या पद्धती, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान यासह सौर ऊर्जेवर चालणारा पंप, ठिबक सिंचन, ट्रॅक्टर्स, जेसीबी यांची माहिती घेतली. याशिवाय शेतीला पूरक उद्योग के ल्यास अडचणींच्या काळात या उद्योगांवरही शेतकरी जगू शकतो. त्यासाठी दुग्धोत्पादन, पशुपालन आदी पूरक उद्योगांची माहिती आणि हे उद्योग उभारणीसाठी विविध शासकीय योजना, अनुदान आणि आर्थिक मदत कशी मिळू शकते याबद्दलचे स्टॉल्सही शेतकऱ्यांना आकर्षित करणारे आहेत. शनिवारपासून तीन दिवस शेतकऱ्यांसाठी एकूण ४५ कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून यात विविध क्षेत्रातले ६० कृषितज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन घेण्यासाठी पाणी आणि वीज यांची नितांत गरज असते. विजेचा प्रश्न सौर ऊर्जेने बऱ्याच प्रमाणात कसा सोडविता येणे शक्य आहे, याबाबत मार्गदर्शन करणारे स्टॉल्स येथे आहेत. तर पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेसह पाण्याची साठवणूक करण्यासाठीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रदर्शनात तज्ज्ञ मंडळी उपलब्ध आहे. हे प्रदर्शन १४ डिसेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते आज कार्यशाळेचे उद्घाटन
‘अॅग्रो व्हिजन’ राष्ट्रीय प्रदर्शनात १२ डिसेंबरपासून सलग तीन दिवस विविध विषयांवर एकूण ४५ कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळांचे उद्घाटन १२ रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते होणार आहे. देशभरातून येणारे ६० तज्ज्ञ कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करतील. १३ रोजी दुपारी १ वाजता ‘भारतीय कृषी क्षेत्रात रेडिएशनची उपयुक्तता’ या विषयावर भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर मार्गदर्शन करतील. प्रयोगशील शेतकरी आपल्या यशोगाथा शेतकऱ्यांना सांगतील.