आक्रमक राज ठाकरे यांनी दिले महात्मा गांधी यांच्या अहिंसेचे धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2022 22:18 IST2022-12-23T22:17:37+5:302022-12-23T22:18:16+5:30
Nagpur News महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेत अपमान सहन करावा लागला होता. आणि त्यानंतरच ते महात्मा झाल्याचे सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागणार आहे, त्यासाठी सज्ज राहा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

आक्रमक राज ठाकरे यांनी दिले महात्मा गांधी यांच्या अहिंसेचे धडे!
नागपूर : आक्रमक भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नागपुरात कार्यकर्त्यांना महात्मा गांधींच्या अहिंसेचे धडे दिले. गांधी यांना दक्षिण आफ्रिकेत अपमान सहन करावा लागला होता. आणि त्यानंतरच ते महात्मा झाल्याचे सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागणार आहे. त्यासाठी सज्ज राहा आणि संघर्ष करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले.
शुक्रवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पक्षाच्या नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले. त्यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना राजकारणात असताना संघर्ष करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी आ. राजू पाटील, अविनाश अभ्यंकर, जयप्रकाश बाविस्कर, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे, हेमंत गडकरी उपस्थित होते.
मनसेकडे कार्यकर्तेच नाहीत म्हणून कार्यकारिणीची घोषणा केली जात नसल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून केला जात होता. परंतु, आज एकाच वेळी २७६ नियुक्तिपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्येच हे नियुक्तिपत्र देण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु, ३०० पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलावणे योग्य ठरले नसते. म्हणून मी नागपुरात आलो आहे. मला कसल्याच पदाची अभिलाषा नसून तुम्हा कार्यकर्त्यांनाच खासदार, आमदार बनायचे असल्याने नव्या ऊर्जेने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भाजपा, शिवसेनेच्या संघर्षाचे स्मरण
- राज ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी भाजपा व शिवसेनेच्या संघर्षाच्या काळाचे स्मरण करवून दिले. जनसंघापासून भाजपापर्यंतचा प्रवास अत्याधिक कठीण होता. कठोर परिश्रमांनेच हा पक्ष १९९६ मध्ये केंद्रात सत्तेवर आला. त्याचप्रकारे शिवसेनेची स्थापना १९६६ ला झाली. परंतु, मुख्यमंत्री पद १९९५ मध्ये प्राप्त झाले होते. मनसे कार्यकर्त्यांनी काही प्राप्त करून घेण्यासाठी संयम बाळगायला हवा. यश निश्चित असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले.
..................