अचानक भोवळ आली, खाली पडले अन् ब्रेन डेड झाले; वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, तिघांना जीवनदान
By सुमेध वाघमार | Updated: September 19, 2023 18:27 IST2023-09-19T18:26:43+5:302023-09-19T18:27:00+5:30
मेंदूमध्ये तीव्र रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांच्या पथकाने मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषीत केले.

अचानक भोवळ आली, खाली पडले अन् ब्रेन डेड झाले; वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, तिघांना जीवनदान
नागपूर : भोवळ येऊन ते खाली पडले, डोक्याला गंभीर दुखापत झाली. नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात भरती केले. उपचाराला सुरुवात झाली, मात्र मेंदूमध्ये तीव्र रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांच्या पथकाने मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषीत केले. त्या दु:खातही वडिलांनी काळाजावर दगड ठेवून मुलाचा अवयवदानाचा निर्णय घेतला. या मानवतावादी पुढाकाराने तिघांना जीवनदान मिळाले. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे),वर्धा येथे हे सलग तिसरे अवयवदान ठरले.
श्रीकांत पांडे, (४७) त्या अवयवदात्याचे नाव. वार्ड क्र. ३, आरवी रोड, गांधी नगर, वर्धा येथील ते रहिवासी होते. प्राप्त माहितीनुसार, श्रीकांत हे घरी असताना अचानक भावेळ येऊन खाली जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्याल गंभीर दुखापत झाली. लागलीच त्यांना आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) वर्धा येथे दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे उपचार केले. परंतु न्यूरोलॉजिकलदृष्ट्या प्रकृती खालावली आणि डॉक्टरांच्या टीमने त्यांना मेंदू मृत घोषित केले. रुग्णालयाचे डॉ.विठ्ठल शिंदे यांनी अवयवदानासाठी कुटुंबाचे समुपदेशन केले. श्रीकांतचे वडील नामदेवराव पांडे, भाऊ नंदकिशोर पांडे, प्रशांत पांडे यांनी त्या दु:खातही अवयवदानाला संमती दिली. याची माहिती, विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र, नागपुरला देण्यात आली. समन्वयक दिनेश मंडपे यांनी प्रतीक्षा यादी तपासून गरजू रुग्णांना अवयवदान केले.