मित्रांचे भांडण सोडविल्याचा फटका, तरुणावर भर रस्त्यावर चाकूने हल्ला

By योगेश पांडे | Updated: November 21, 2023 17:13 IST2023-11-21T17:12:43+5:302023-11-21T17:13:41+5:30

जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

After resolving a quarrel between friends, a young man was attacked with a knife on the street | मित्रांचे भांडण सोडविल्याचा फटका, तरुणावर भर रस्त्यावर चाकूने हल्ला

मित्रांचे भांडण सोडविल्याचा फटका, तरुणावर भर रस्त्यावर चाकूने हल्ला

नागपूर : काही दिवसांअगोदर मित्रांचे भांडण सोडविल्याच्या रागातून तीन आरोपींनी एका तरुणावर भर रस्त्यावर चाकूने हल्ला केला. जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

फैजान एजाज अहमद (२८, भाजी मंडी, कामठी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. काही दिवसांअगोदर त्याने मित्रांचा वाद सोडविला होता. सोमवारी तो त्याच्या मित्रासोबत भाजी बाजारातील रस्त्यावर उभा होता. अचानक तेथे शेख रिहान शेख मोहम्मद (कामठी), शेख तौसिफ (कामठी) व मोनाखान करीम खान (जुनी खलासी लाईन, कामठी) हे तेथे पोहोचले. त्यांच्या फैजानसोबत जुना वाद होताच. त्यावरून त्यांनी भांडण सुरू केले व काही दिवसांअगोदर मित्रांचा वाद का सोडविला असे म्हणत त्याला मारायला लागले.

शेख रिहान शेख मोहम्मद याने खिशातून चाकू काढत भर रस्त्यावर फैजानवर वार केले. यात त्याच्या हाताला जखम झाली. फैजानने आरडाओरड केल्याने आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्याच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलीस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

Web Title: After resolving a quarrel between friends, a young man was attacked with a knife on the street