'सम्राट अशोकानंतर बाबासाहेबांनी केले धम्माला पुर्नजिवित' भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई
By आनंद डेकाटे | Updated: November 26, 2025 20:25 IST2025-11-26T20:23:37+5:302025-11-26T20:25:16+5:30
Nagpur : अशोका-आंबेडकर धम्मरत्न नोबेल पुरस्काराने सन्मानित

'After Emperor Ashoka, Babasaheb revived Dhamma' Bhadant Arya Nagarjuna Surei Sasai
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मौर्य सम्राट अशोकानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माला पुर्नजिवित केले. त्यामुळे दोन्ही महापुरुषाचे नाव सुवर्णाक्षरांनी इतिहासात कोरले गेले. या महापुरुषांच्या नावे असलेला पुरस्कार मला मिळाला. या पुरस्कारामुळे अतिशय आनंद झाला तसेच ऊर्जा मिळाली, असे प्रांजळ मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी व्यक्त केले.
बुद्धीस्ट फॅटरनिटी कॉन्सिल, बुद्धीस्ट फॅटरनिटी वुमेन संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे औचित्य साधून दीक्षाभूमीच्या सभागृहात भदन्त ससाई यांना अशोका-आंबेडकर धम्मरत्न नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी ससाई आपल्यासत्काराला उत्तर देताना बोलत होते. मंचावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारती प्रभु, रोषणी गायकवाड, अन्बु सेल्वन, अॅड, मयुरी किर्ती, भदन्त सुनिती, भदन्त धम्मसारथी, स्मारक समितीचे विलास गजघाटे व डॉ. प्रदीप आगलावे, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, डॉ. विनोद रंगारी उपस्थित होते. यावेळी ससाई यांना एक लाखाचा धनादेश, सम्राट अशोक यांची मूर्ती, प्रमाणपत्र आणि शिल्ड प्रदान करण्यात आले.
भारती प्रभु यावेळी म्हणाले की, भदन्त ससाई गेल्या ६० वर्षांपासून धम्माचा प्रचार-प्रसार करीत आहेत. धम्म आणि समाजासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या समर्पित कार्याची दखल घेत पुरस्कार देण्यात आला. आता हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येणार असून पुढील वर्षी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना देण्याचे निश्चित झाले आहे. शांती, मैत्री, करुणा, बंधुभाव निर्माण करण्याचा आणि समाजात समर्पित असणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. संचालन अॅड.मयुरी किर्ती आणि आकाश खोब्रागडे यांनी तर विहंग मेंढे यांनी आभार मानले.
साठ वर्षांचा प्रवास
भदंत ससाई यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. जपान ते भारत आणि नागपूर असा ६० वर्षोंचा प्रवास आणि कार्याची माहिती चित्रीकरणाच्या माध्यमातून देण्यात आली. यावेळी संगीतकार विवार्थ् रंगारी यांनी सम्राट अशोका-डा. आंबेडकर आणि भदंत ससाई यांच्या जीवनावर आधारित तयार केलेल्या गीत -संगीताचे उद्घाटन ससाई यांनी केले.