काँग्रेसचे कथित मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे 'बालीश'च; फडणवीसांवरील वक्तव्याचा भाजपने घेतला समाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 18:48 IST2022-03-30T11:14:37+5:302022-03-30T18:48:38+5:30
काँग्रेसचे कथीत मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचे वक्तव्य बालीशपणाचे आहे. त्यांनी आधी महानगरपालिकेची प्रभागाची वा वार्डाची निवडणूक लढवून ती जिंकून दाखवावी, असे थेट आव्हान भाजपचे प्रदेश सचिव अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.

काँग्रेसचे कथित मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे 'बालीश'च; फडणवीसांवरील वक्तव्याचा भाजपने घेतला समाचार
नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम मतदार संघाचे नेतृत्व करताना स्वत:च्या मतदार संघातील जनतेसह विदर्भातील जनतेची प्रताडणा करणे, हे काँग्रेसचे कथीत मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांचे वक्तव्य बालीशपणाचे आहे. लोंढेंनी आधी महानगरपालिकेची प्रभागाची वा वार्डाची निवडणूक लढवून ती जिंकून दाखवावी, असे थेट आव्हान भाजपचे प्रदेश सचिव अॅड. धर्मपाल मेश्राम (adv. Dharmpal Meshram) यांनी केले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अतुल लोंढे यांनी केलेल्या वक्तव्याचा अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून चांगलाच समाचार घेतला. एखाद्या मोठ्या स्तरावरील नेत्यावर थेट आरोप केले की मनाला समाधान वाटते, या भ्रमात असलेल्या अतुल लोंढेंचे वक्तव्य हे ते कोणत्याही पातळीवर काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्यासारखे वाटत नसल्याची प्रचिती देणारे आहे, असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये विदर्भाच्या संदर्भात जे आवाज उचलले, जे निर्णय घेतले. त्यापैकी एक तरी निर्णय या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे का, असा सवालही अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केला.
विदर्भाचा अनुशेष, धानाचे प्रश्न यावर देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे निर्णय घेतले. धानाचा बोनस त्यांनी एका झटक्यात देऊन टाकला. मात्र महाविकास आघाडी सरकार अजूनही बोनस देऊ शकले नाही. अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्र्यांनी विशेषत: काँग्रेसच्या मंत्र्यांनी, प्रदेशाध्यक्ष असलेल्या विदर्भातील नाना पटोले यांनी विधानसभेत कोणत्या प्रश्नावर आवाज उचलला, असाही घणाघाती सवाल त्यांनी केला. त्यातही कुठेही कशाचेही ताळमेळ नसलेले लोंढे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलतात. दक्षिण पश्चिम मतदार संघातील नागरिकच नव्हे तर नागपूर शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी देवेंद्र फडणवीस यांचे कार्य, त्यांचे नेतृत्व मान्य करीत त्यांना भरभरून प्रेम दिले आहे.
लोंढेंनी आधी साधी नागपूर महानगरपालिकेची प्रभागाची निवडणूक लढवून निवडून येऊन दाखवावे, हिंमत असेल तर आमच्या समोर येऊन दाखवावे असे थेट आव्हान अॅड. मेश्राम यांनी दिले. तसेच लोंढे कोणत्याही प्रकारे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते वाटत नसून त्यांचे वागणे बालीशपणाचे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.