भाजपच्या गडात काँग्रेसच्या वंजारींची आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST2020-12-04T04:25:40+5:302020-12-04T04:25:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात मतमोजणीत पहिल्या दोन फेऱ्यांत ...

भाजपच्या गडात काँग्रेसच्या वंजारींची आगेकूच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात मतमोजणीत पहिल्या दोन फेऱ्यांत भाजपला जबर धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना पहिल्या पसंतीची २४ हजार ११४ मते प्राप्त झाली असून भाजपचे संदीप जोशी यांना १६ हजार ८५२ मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीअखेर वंजारी हे ७ हजार २६२ मतांनी आघाडीवर होते. ५८ वर्षांपासून शाबूत असलेल्या बालेकिल्ल्यातच पिछाडीवर गेल्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण असून काँग्रेसमध्ये उत्साह दिसून आला.
अपक्ष उमेदवार अतुलकुमार खोब्रागडे हे ३ हजार ६४४ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर तर नीतेश कराळे हे २९९९ मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारी कोटा पूर्ण करू शकले नाहीत तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातील. त्यामुळे अंतिम निकाल मध्यरात्रीनंतरच येण्याची शक्यता आहे.
यावेळी एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. कोरोनामुळे फारशी अपेक्षा नसतानादेखील मतदारसंघातील सहाही जिल्ह्यात एकूण ६४.३८ टक्के मतदान झाले. १ लाख ३२ हजार ९२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे ग्रामीण भागातूनदेखील जोरदार प्रतिसाद मिळाला. गेल्या निवडणुकीत ३४.७० टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे समीकरण बदलेल की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती.
गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्याच फेरीत वंजारी यांनी ४ हजार ८५० मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीत वंजारी यांना १२,६१७ तर जोशी यांना ७,७६७ मते मिळाली. दुसऱ्या फेरीतही वंजारी यांच्या मताधिक्यात २ हजार ४१२ ची भर पडली. दुसऱ्या फेरीअखेर एकूण ५१ हजार २३१ मतांची मोजणी पूर्ण झाली. त्यातील तब्बल ४ हजार ७६९ मते अवैध ठरली.
———————————
भाजपच्या धुरिणांची रणनीती फसली
- नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या दिग्गज व नामवंत नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आजवर हा मतदारसंघ भाजपने एकतर्फी जिंकला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे व या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अनिल सोले यांचे तिकीट कापत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना संधी देण्यात आली. या मतदारसंघात भाजपची व्होट बँक पक्की आहे. उमेदवार बदलला तरी काहीच फरक पडत नाही, असा दावा भाजपची रणनीती आखणाऱ्या नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र, तिसऱ्या फेरीअखेरही भाजपची पीछेहाट पाहता रणनीती फसल्याचे दिसून आले.